मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (Maharashtra Vidhan Sabha) सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या भेटीगाठी पाहायला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करताना कोणतीही तमा न बाळगाणारे, वैयक्तिक पातळीवर हीनकस टीका करणारे विरोधक एकत्र पाहायला मिळाले. भाजप नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यासोबत भेट झाली. ती भेट होते ना होते तोच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. या भेटीदरम्यान, सर्व नेत्यांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळालच, पण राजकीय टोलेबाजीही पाहायला मिळाली. 


नेमकं काय घडलं? 


14 व्या विधानसभेचे शेवटचे पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली. मात्र अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राजकीय परंपरा पाळत विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या. चंद्रकांत पाटील सर्वात आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले. 


अंबादास दानवेंच्या दालनात भेट


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांच्या दालनात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि अनिल परब दोघेही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना पाहताच आश्चर्य व्यक्त केला. दोघांनीही एकमेकांची भेट घेऊन काही क्षणांसाठी गप्पा मारल्या. चंद्रकांत पाटील हे भलं मोठं चॉकलेट घेऊन अंबादास दानवेंच्या भेटीला आले होते. चॉकलेट घेऊन आलेल्या चंद्रकांत पाटलांना अंबादास दानवेंनी पेढे दिले. आमचे 31 खासदार निवडून आलेत, पेढे घ्या, असं अंबादास दानवे म्हणाले. यावेळी सर्वांचा हसतखेळत संवाद पाहायला मिळाला. चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना दिला. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मी यांचा (अनिल परब) पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो आणि अभिनंदन करतो. चंद्रकांत पाटलांचे वाक्य ऐकून, सर्वजण मोठ्याने हसले. अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून लढले आहेत. कालच मतदान झालं असून एक जुलैला निकाल आहे. त्यांच्याविरोधात भाजप आणि महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांनी निवडूक लढवली. पण त्याआधीच चंद्रकांत पाटील यांनी विरोधात असलेल्या अनिल परब यांना पेढा भरवून अभिनंदन केलं.


 उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट


एकीकडे चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा सुरु असताना, काही क्षणातच विधीमंडळातील लिफ्टजवळ आणखी एक मोठी भेट झाली. ही भेट होती उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. दोघेही एकत्र, एकाच लिफ्टसाठी उभे राहिल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, आमदार विलास पोतनीस उपस्थित होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपची नेतेमंडळी होती. यानंतर काही क्षणात लिफ्ट आली तर लिफ्टमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ होते. लिफ्टचा दरवाजा उघडताच देवेंद्र फडणवीसांनी हातवारे करत बाहेर या बाहेर या असं सांगितलं. त्यावेळी भरलेल्या लिफ्टमधून काहीजण बाहेर आले आणि त्यांनी फडणवीस आणि ठाकरेंना जागा करुन दिली. 


त्यावेळी लिफ्टमध्ये जाताना उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांच्याकडे बोट दाखवून याला आधी बाहेर काढा, याला आधी बाहेर काढा असं मस्करीत म्हणाले. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले, माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? असं हसत हसत उत्तर दिलं. त्यानंतर लिफ्ट दुसऱ्या क्षणात पुढे गेली. 


लिफ्टमध्ये काय झालं?



  • देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तीन मिनिटांची विधानभवनात लिफ्टमुळे समोर समोर भेट झाली.

  • लिफ्टबाहेर दोन्ही नेत्यांचा अडीच मिनिटे एकमेकांशी संवाद 

  • दोघेही नेते लिफ्टमध्ये प्रवास करत असताना लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्विय साहाय्यक मिलिंद नार्वेकर, प्रविण दरेकर आणि छगन भुजबळ, अनिल परब उपस्थित होते. तळ मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर असा 30 सेकंदाचा प्रवास झाला.


प्रवीण दरेकरांनी भेटीची कहाणी सांगितली!


उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची कहाणी प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाला सांगितली. प्रवीण दरेकर म्हणाले, "राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं. 


उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया


दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनातील रणनीती सांगून सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर पत्रकारांनी ठाकरेंना भेटीबाबत विचारलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी आणि देवेंद्रजी यांचा लिफ्ट प्रवास हा योगायोगच आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे या पुढे गुप्त बैठक तिथेच करू. 


Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis VIDEO : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच लिफ्टने प्रवास



संबंधित बातम्या  


असंच प्रेम राहू द्या, दादांसोबतच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास!


Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!