मुंबई : राज्य विधिमंडळाचं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं असून अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावरुनच सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेले स्वागत चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे कालच त्यांनी, हे खोके सरकारच्या निरोप समारंभाचं अधिवेशन (Adhiveshan) असल्याचं म्हटलं होतं.  त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असल्याने घोषणांचा पाऊस पडेल, पण अंमलबजावणीचं काय, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेचे बाण चालवले. लाडकी बहिण योजनेवरुनही प्रश्न उपस्थित केले आहेत.

  


निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता असून ते उद्याच करतील, ज्या योजना व घोषणा केल्या जातात त्यात आर्थिक तरतूद केली जाते. उद्या घोषणांचा पाऊस पडेल, पण निधीच दिला जाणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी,पहिल्याच पावसात राम मंदिरात झालेल्या वगळतीवरुन आणि देशभरातली पेपर फुटीवरुनही ठाकरेंनी मोदी सरकावरला लक्ष्य केलं. राम मंदीराला गळती झाली, पेपर गळती झाली, असे म्हणत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. 


उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : -


''अधिवेशनात आमच्याकडून नागरिकांच्या जिवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील. रोज एक शेतकरी अमरावतीत आत्महत्या करतोय. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की, राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांचं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकीत शेती आहे. असा राज्यात नव्हे, देशात कुठलाही शेतकरी नसेल, जो हेलिकॉप्टरने शेतात जातो आणि पंचतारांकीत शेती करतो. विशेषत: आमवस्या पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात, असं माझ्या कानावर आलंय.'', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.  


राज्यात दररोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत, 10 हजार 22 कोटींची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात नाही. NDA च्या सरकारने सर्वकही शेपटावर निभावलय. नागपूर अधिवेशनात कोणीही न मागता मी 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. अजूनही 3 महिने निवडणुकीला आहेत, तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही घोषणा केली होती, तीही अद्याप झालेली नाही. नुसत्या घोषणा करू नका त्याची अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांवर बंदुक रोखली आहे, त्यांचा वाली कोण आहे, असे म्हणत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.  


मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नका


मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणत आहेत. मात्र, मुलं मुली भेदभाव करू नका, लाडक्या भाऊंना देखील सरकारने मदत करावी. पोलिस भरतीत तरुणांना राहण्यास व्यवस्था नाही, सोई सुविधा नाही. जोगेश्वरीत पोलीस भरतीसाठी आलेली मुले ब्रीजखाली झोपत आहेत, असे म्हणत पोलीस भरतीतील युवकांच्या प्रश्नांकडे ठाकरेंनी लक्ष्य वेधले. डब्बल इंजिन सरकारने आतापर्यंत अनेक वाफा सोडल्या आहेत, लाडक्या बहिण योजनेचं स्वागत करतो. मात्र, लाडक्या भावालाही मदत करा, असेही ते म्हणाले.  


लिफ्ट भेट योगायोगच


चंद्रकांत दादांनी मला आज चॉकलेट दिलं, तसेच महिलांच्या मोफत शिक्षणाचंही चॉकलेटचं दिलं होतं. लाडक्या बहिण योजनांची अंमलबजावणीसाठी सुधीर भाऊंकडे देऊ नका, महिलांना शिवीगाळ करणारे मंत्री या राज्यात राहूच कसे शकतात, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  


श्वेतपत्रिका काढा


पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन हा विषय संपवायला हवा. NEET  प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप इंडस्ट्री कोणाची आहे. हा गाजर अर्थसंकल्प आहे, उद्या घोषणा करण्याआधी मागे केलेल्या घोषणांची अंमलबजावणी किती झाली, याबाबत श्वेतपत्रिका काढा. सूर्यफुल व मोहरीवर आयात शुल्क लावता, मग शेतकऱ्यांना कसा भाव मिळणार, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.


मुंबईत मराठी माणसांना 50 टक्के घरं


मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, मुंबईत त्यांना घरं मिळालीच पाहिजेत, आम्ही यासाठी पू्र्वीपासून आग्रही होतो. आता जे सरकारमध्ये मंत्रीआहेत ते विकासक आहेत. लोढांच्या टॉवरमध्ये 50 टक्के मराठी बांधवांना घरांसाठी आरक्षण द्यायला हवे. त्यांनी त्यांचा टॉवरमध्ये घेऊन दाखवावं. कारण, ते बसतात ना मुंबई महापालिकेत, असे म्हणत ठाकरेंनी लोढांना लक्ष्य केले. तसेच, आमचं सरकार आल्यास मुंबईत 50 टक्के मराठी माणसांना घरे देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


मी माझा निर्णय सांगितलाय


पवारसाहेब परत येऊ पहणाऱ्या आमदारांबाबत जे बोलले ते त्यांच्या पक्षाबाबत बोलले, मी माझा निर्णय सांगितला आहे, असेही स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले.