Maharashtra Political Crisis : "उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे," असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. "जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत," असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. "जनता गद्दारांना धडा शिकवेल," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
'निवडणुका लवकर घेण्याची हिंमत यांच्यात नाही'
कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, "यांच्याकडे सगळंच पैशांनी काम होतं. माझ्याकडे माझी रक्तामांसाची, जिवाला जीव देणारी माणसं आहेत. तुम्ही सदस्यपत्र घेऊन आलेला आहात तो मी पहिला टप्पा मानतो. कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. निवडणुका कधी एक येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो. पण निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे, असं मला वाटत नाही."
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी
शिवसेनेत फूट पडली आणि महाराष्ट्रात राजकीय संकट ओढावलं. सत्तेचा हा पेचप्रसंग थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणं, खरी शिवसेना कोणाची, तसंच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होईल. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलं आहे. हे यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. मागील दोन सुनावणीत दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ विधीज्ञांनी घमासान युक्तिवाद केला आहे. या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर ही तारीख पुन्हा बदलून 22 ऑगस्ट केली आहे.
तर दुसरीकडे सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता उद्या म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत काय होतं, याकडे लक्ष लागलं आहे.