Maharashtra Politics Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात शिवसेनेतील बंडखोरीमुळे खोके हा शब्द चांगलाच गाजत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील पाच खोके नॉट ओके म्हणत बंडखोरांवर निशाणा साधला. मातोश्रीवर आज सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पाच बॉक्स भरून सभासद नोंदणी, प्रतिज्ञापत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती दिली. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सध्या खोक्यांची चर्चा सुरू आहे. तुम्हीदेखील पाच खोके आणले आहेत. पण, पाच खोके नॉट ओके. मात्र, त्यांचे खोके वेगळे आहेत आणि आपल्या खोक्यात निष्ठा असल्याचे सांगत ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. बंडखोरांचा उल्लेख टाळत त्यांनी म्हटले की, त्यांच्याकडे सगळे पैशांनी काम होत आहेत. सगळ्याच गोष्टींसाठी पैशांचा वापर करत आहेत. मात्र, आपल्याकडे निष्ठा आहे, प्रामाणिक लोक असल्याचे उद्धव यांनी सांगितले. आज आलेली सदस्यनोंदणीचे गठ्ठे हा पहिला टप्पा असल्याचे समजतो. यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर हे निष्ठेचे खोके यायला हवेत असेही त्यांनी म्हटले.
त्यांच्यात हिंमत नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत नसल्याचे उद्धव यांनी म्हटले. राज्यातील जनता निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी वाट पाहत आहेत. मात्र, निवडणुका येईपर्यंत लोकांपर्यंत आपण जायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. अधिकाधिक लोकांना आपण शिवसेनेसोबत जोडायला हवे असेही त्यांनी आवाहन केले.
विधीमंडळ अधिवेशनात बंडखोरांवर निशाणा
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून बंडखोरांवर टीका केली जात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून '50 खोके, एकदम ओके' अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्यात. या घोषणाबाजीने बंडखोर आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असल्याचे म्हटले जात आहे. विधीमंडळातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार बाहेर पडत असताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी '50 खोके, एकदम ओके' अशी घोषणा दिली होती. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी तुम्हाला हवेत का, अशी उलट विचारणा केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: