Amit Shah Himachal Pradesh Visit: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh)  विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढताना दिसत आहे. येथे सत्तेत असलेल्या भाजपला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे कडवे आव्हान आहे. राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासही भाजप जोरदार प्रचार करत आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी (6 नोव्हेंबर) कांगडा येथील नगरोटा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यादरम्यान अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि समान नागरी संहितेबाबतही बोलले.


अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, हिमाचलमध्ये पुन्हा जय राम ठाकूर यांचे सरकार येणार असून येथे समान नागरी संहिता लागू केली जाईल. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने व्होट बँकेच्या राजकारणात राष्ट्रीय प्रश्नांवर काम होऊ दिले नाही. ते पुढे म्हणाले की, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)  सरकारने माता-भगिनींच्या सन्मानार्थ संपूर्ण राज्यातील महिलांचे प्रवास भाडे निम्म्याने कमी केले आहे. हिमाचल सरकारने पहिल्यांदाच आपल्या बजेटमधील 20% महिला शक्तीसाठी राखीव ठेवला आहे.


नगरोटा येथे निवडणूक सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी येथे येत असताना काँग्रेस उमेदवाराची रॅली पाहिली. रॅलीच्या ठिकाणावरून काही 10 आश्वासनांचा उल्लेख करण्यात आला. अमित शाह म्हणाले की, आश्वासन फक्त त्यांचंच मानलं जातं, ज्यांचा काही ना काही रेकॉर्ड आहे. काँग्रेसवर निशाणा साधत अमित शाह म्हणाले की, तुमच्या आश्वासनांवर कोण विश्वास ठेवणार? अमित शाह म्हणाले की, दहा वर्षे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे सरकार होते. या काळात 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आणि आज ते हिमाचलच्या लोकांना आश्वासने देत ​​आहेत. तुमच्या आश्वासनांवर कोणी विश्वास ठेवणार नाही.


अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, संपूर्ण देश हिमाचलला (Himachal Pradesh)  देवभूमी म्हणून ओळखतो. पण मी नेहमी म्हणतो की ही हिमाचल केवळ देवभूमी नाही तर वीरभूमी आहे. जास्तीत जास्त पुत्र पाठवून माता भारतीला सुरक्षित ठेवण्याचे काम येथील शूर मातांनी केले आहे. ते म्हणाले की, येथे काँग्रेसचा एकच मुद्दा आहे, एकदा भाजप, एकदा काँग्रेस निवडणून येते, ही येथील प्रथा आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेश , उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि आसाममध्ये जाऊन बघावे, प्रथा बदलली आहे. आता एकदा भाजप आला की पुन्हा पुन्हा भाजप येते, असं ते म्हणाले आहेत.