By Election Results 2022: देशातील 6 राज्यांतील अनेक जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या सात विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर आज याचे निकाल समोर आले आहे. यामध्ये बिहारमधील 2 आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, ओडिशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तर हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे आणि ओडिशातील धामनगर जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.


अंधेरी पूर्व सीट


मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भाजपने शेवटच्या क्षणी येथे आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लट्टे यांना ही निवडणूक जिंकणे सोपे झाले होते. 


उत्तर प्रदेश 


लखीमपूरच्या गोला गोकरनाथ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमन गिरी विजयी झाले आहेत. येथे समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढत होती. या पोटनिवडणुकीत बसपा आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे न केल्याने भाजप आणि सपा यांच्यातील मुख्य लढत  झाली.


बिहार 


बिहारच्या दोन्ही विधानसभा जागांपैकी राष्ट्रीय जनता दलाने मोकामावर आपले नाव कोरले, तर गोपालगंजमध्ये भाजपने विजय मिळवला. मोकामा येथे आरजेडीच्या नीलम देवी यांनी भाजपच्या सोनम देवी यांचा पराभव केला. आरजेडीचे आमदार अनंत सिंह यांच्या अपात्रतेनंतर ही जागा रिक्त झाली होती.


हरियाणा 


हरियाणाच्या हिसारमधील आदमपूर मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान भाजपचे भव्य बिश्नोई सर्व फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जय प्रकाश यांचा पराभव केला.


मुनुगोडूमध्ये टीआरएसचा विजय


तेलंगणातील मुनुगोडू पोटनिवडणुकीत टीआरएसने विजय मिळवला आहे. काँग्रेस आमदार कोमिता रेड्डी यांनी पक्षांतर करून राजीनामा दिल्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली. मुनुगोडू जागेसाठी एकूण सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात होते, परंतु मुख्य लढत भाजपचे उमेदवार राजगोपाल रेड्डी आणि माजी टीआरएस आमदार कुसुकुंतला प्रभाकर रेड्डी आणि काँग्रेसच्या पी श्रावंती यांच्यात होती.


ओडिशा 


भाजपचे उमेदवार आणि दिवंगत नेते विष्णू सेठी यांचा मुलगा सूर्यवंशी सूरज यांनी ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील धामनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. येथे बिजू जनता दलाने अवंती यांना तर काँग्रेसने बाबा हरेकृष्ण सेठी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. धामनगर मतदारसंघात भाजप आमदार विष्णू सेठी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली.