Hatkanangle Lok Sabha : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांना काय ऑफर दिली आणि ती त्यांनी का नाकारली, याबाबत पहिल्यांदाच राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया देत खुलासा केलाय. हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha) प्रचार तोफा आता शांत झाल्या आहेत. त्यानंतर आज राजू शेट्टी शिरोड मध्ये आपल्या कुटुंबासोबत निवांत रमले आहेत. त्या वेळी ते बोलत होते. हातकणंगलेची जागा मला द्या, अशी मागणी महाविकास आघाडीकडे कधीच केली नव्हती. तरीही महाविकास आघाडीचे अनेक नेते हातकणंगलेची जागा राजू शेट्टीसाठी सोडली, असे जाहीर करून भ्रम निर्माण करत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


....म्हणून उद्धव ठाकरे यांची ऑफर नाकारली 


फक्त एकदा उद्धव ठाकरे यांना भेटून हातकणंगले मधून तुमच्या गद्दाराला पराभूत करण्यासाठी तुम्ही उमेदवार देऊ नका, असे सांगितले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे ही त्यासाठी तयार होते. मात्र, यादी जाहीर करण्याच्या आदल्या दिवशी मला मशालवर लढण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, तसे केले असते तर ठाकरे गटाच्या घटनेमुळे मला शेतकरी चळवळ नेहमीसाठी सोडावी लागली असती. ते मला कधीच करायचे नव्हते, म्हणून उद्धव ठाकरे यांची ऑफर नाकारल्याचा खुलासाही राजू शेट्टी यांनी केला. एबीपी माझा अशी खास बातचीत करताना गेल्या पाच वर्षात काय काय घडलं आणि कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला याची संपूर्ण कहाणीही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलीय. 


तर मला शेतकरी चळवळीवर पाणी सोडावं लागलं असतं 


गेले तीन महिने सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मी प्रचार करत होतो. मात्र, काल प्रचारतोफा शांत झाल्याने आता मी मात्र निवांत आहे. 2019 च्या पराभवाच्या दिवशीच पुन्हा निवडणूक लढवायची आणि ती जिंकायची असा निर्धार मी केला होता. सहा महिन्यापूर्वीच कुठल्याच आघाडीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले होते आणि तशी व्यूह रचना आखणेही सुरू केले होते. तसे ही आमच्या पक्षाने 5 एप्रिल 2021 च्या कार्यकारिणीच्या बैठकीत कुठल्याही आघाडीत जायचं नाही असा निर्णय केला होता. तो निर्णय माझ्यावर बंधनकारक होता. तरीही महाविकास आघाडीचे अनेक नेते वारंवार हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी पक्षासाठी सोडल्याचे जाहीर करत होते.


आम्ही ती जागा मागितलीच नव्हती, तर तसं जाहीर करण्याचा काही कारणही नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. जागा माझ्यासाठी सोडा या मागणीसाठी मी महाविकास आघाडीचे कुठल्याही नेत्यासोबत भेटलो नाही. फक्त एकदा उद्धव ठाकरे यांची भेट  घेऊन, तुम्हाला जर तुमच्या पासून फुटून गेलेल्या गद्दाराला ( धैर्यशील माने) पराभूत करायचे असेल तर तुम्ही इथे उमेदवार देऊ नका, एवढा शहाणपणा दाखवा असे त्यांना सांगितले होते. उद्धव ठाकरे यांची त्यासाठी तयारी होती. यादी जाहीर करताना राजू शेट्टी यांना पाठिंबा असा आम्ही जाहीर करू, असे ते मला म्हणाले होते.


मात्र, यादी जाहीर होण्याच्या आदल्या रात्री मला मशाल या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चिन्हावर लढण्यासाठी सांगण्यात आले. मी एकही क्षणाचा विलंब न लावता तुमच्या चिन्हावर (मशाल वर ) लढणार नाही, हे स्पष्ट केले होते. कारण शिवसेना ठाकरे गटाच्या घटनेमुळे माझी तांत्रिक अडचण होणार होती. मी शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर लढलो असतो, तर मला शेतकरी चळवळीवर पाणी सोडावं लागलं असतं. जे मला मुळीच करायचे नव्हते. असेही राजू शेट्टी म्हणाले.


सर्वांनी आवर्जून मतदान करा- राजू शेट्टी 


मतदारसंघ खूप मोठा आहे.त्यामुळे गेले तीन महिने सतत दगदग करावी लागली. मात्र मी हाडाचा शेतकरी आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही दगदग नवीन नाही. मतदारांनी मतदानाच्या हक्काचा वापर करावा. सुट्टी आहे म्हणून फिरायला जाऊ नये. सकाळी लवकर मतदान करावं. मत कुणालाही द्या, मात्र उमेदवाराचे चारित्र्य, बौद्धिक क्षमता, लोकांप्रती त्याची आस्था लक्षात घेऊनच मतदान करा. 


इतर महत्वाच्या बातम्या