कोल्हापूर : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका मुलाखतीत 16 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले. त्यामुळे, आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राज्यात 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे . मात्र, याबाबत महायुतीचे तीन प्रमुख नेते बसून निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushriff) यांनी म्हटले. यावेळी, शपथविधी सोहळ्यातील जाहिरातीच्या चुकीवरुन त्यांनी जाहीरपणे दिलगिरी देखील व्यक्त केली. तसेच, शासनाच्यावतीने आपण माफी मागत असल्याचंही ते म्हणाले. तर, लाडकी बहीणच्या मुद्दयावरुन खासदार सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) टोलाही लगावला. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाचा रोड मॅप जनतेसमोर ठेवला आहे. गतिमान सरकार पुढील पाच वर्षात आपल्याला पाहायला मिळेल. जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. तसेच, मंत्रिपदावरून कोणत्याही पक्षाकडून रस्सीखेच किंवा मतभेद नाहीत. आमच्या पक्षाच्या वाटणीला जी मंत्रीपद येतील त्याचा सर्वस्वी निर्णय अजितदादा घेतील त्यांच्या आदेशाचे पालन आम्ही सर्वजण करू, अशी भूमिका मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती मंत्री पद मिळतील याची मला काही माहिती नाही, महायुतीचे तीन प्रमुख नेते बसून याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


शपथविधीच्या जाहिरातीवरुन जाहीरपणे माफी


शपथविधी सोहळ्यासाठी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या महायुतीच्या जाहिरातीमध्ये अनावधानाने राजर्षी शाहू महाराजांचा फोटो राहून गेला असेल, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण राजर्षी शाहू महाराजांना बाजूला करणे हे आमच्या मनात देखील नाही. संपूर्ण शासनाच्या वतीने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे माफी मागितली. 


समरजीत घाटगेंना टोला


दरम्यान, कोणत्याही घटनेतील पीडीतेचे नाव घ्यायचे नसते. मात्र, राजकारणामध्ये जे मॅच्युअर नाहीत ते पीडीतेचं नाव घेतात असे म्हणत समरजीत घाटगे यांना टोलाही लगावला. मुरगुड मध्ये विषबाधेमुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित कुटुंबांना मदत करण्याबाबत विनंती करणार आहे. तसेच, यामध्ये फूड अँड ड्रग विभागाने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


ईव्हीएमवरुन विरोधकांना चॅलेंज


लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगलं होतं आता आमच्या जागा आल्या त्यावेळी ईव्हीएम बाद झालं का? अनेकवेळा निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने याबाबत खुलासा केला आहे. आतापर्यंत कोणीही सिद्ध केले नाही, ईव्हीएम हॅक होतं, असे म्हणत विरोधकांना चॅलेंज दिलं आहे. तर, लाडकी बहीण शेतकरी आणि महायुती सरकारने जे निर्णय घेतले होते त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाल्याचंही ते म्हणाले. 


सुप्रिया सुळेंना टोला, टाटा-बिर्लाच्या मुलींना कसा लाभ मिळेल?


लाडक्या बहिणीची काळजी सुप्रिया सुळे यांनी करू नये. आम्ही 1500 रुपयेचे 2100 रुपये लवकरच करणार आहोत. नियमात असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळेल. पण टाटा, बिर्लाच्या मुलींना कसा याचा फायदा होईल? असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला. आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीकडून वसुली करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. 


शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरात रद्द


शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रद्द झाला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना देखील याबाबत सांगितलेलं आहे. कारण, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यास विरोध आहे. सांगलीपर्यंत शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर आपण नको कसं म्हणणार. तर, कोल्हापूरच्या पुढे गोव्याला कसं जायचं हे सरकार ठरवेल. पण कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ हा रस्ता रद्द झालेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा


चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ