बारामती: यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणारा बारामती मतदारसंघ सध्या राजकीय वर्तुळाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. महाविकास आघाडीकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे रिंगणात उतरणार आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवले जाणार, हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे बारामती मतदारसंघाची लढत जिंकणे, हे शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) गटासाठी कधी नव्हे इतके मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडून बारामती मतदारसंघात मोर्चेबांधणी केली जात आहे. यापूर्वी राजकीय वैर असलेल्या नेत्यांशी शरद पवार आणि अजित पवार दोघेही जुळवून घेताना दिसत आहेत. परंतु, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महायुतीमधील मित्रपक्षांशी जुळवून घेताना बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. नुकताच भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. या प्रकरणावर पडदा पडला नसेल तोच आता हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.


हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी हर्षवर्धन पाटील यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे म्हटले होते. परंतु, यानंतरही हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अजूनही कायमच असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे मात्र जागा वाटप झाले नाही, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. सुनेत्रा पवार यांची बारामतीमधून अधिकृत उमेदवारी जाहीर नसली तरी त्यांनी सध्या लावलेला प्रचाराचा धडाका बऱ्या गोष्टी स्पष्ट करणारा आहे. सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना हर्षवर्धन पाटील यांना विश्वासात घेतले नाही का, असा प्रश्न विचारला जातोय. महायुतीचे जागावाटप झाले नाही. जेव्हा जागावाटप होईल आणि तेव्हा आपल्याला बैठकीला बोलावतील. जर बैठकीला बोलावलं नाहीतर तर आपले काम सुरुच ठेवू, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरु आहे. त्यातच आपलं काम सुरूच आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ नेमका काय, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. हर्षवर्धन पाटील यांना नेमकं काय म्हणायचं होतं, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.  त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेताना हर्षवर्धन पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा किंवा विचारविनिमय झाला किंवा नाही, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून त्यांच्याशी संपर्क साधला जाणार का, हेदेखील बघावे लागेल. 


हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकदिलाने लढू शकतील?


बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी अजित पवार यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यापूर्वी राजकीय वैर असलेल्या विरोधकांशीही अजितदादांनी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, भाजपचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत अजून जुळू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकित पाटील यांनी अजित पवारांनी आपल्या वडिलांच्या पाठीत तीनवेळा खंजीर खुपसल्याची भाषा केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत त्यांना मतदारसंघात फिरु न देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. हा वाद जरा कुठे विस्मृतीत जातोय, असे वाटत असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील बारामतीमध्ये अजित पवारांना मनापासून साथ देतील का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


आणखी वाचा


अजित पवारांनी दुखावलेले हर्षवर्धन पाटील, शिवतारे, तावरे, जाचक, कुल, थोपटे कुणाला साथ देणार?