पुणे : बारामती म्हणजे पवार (Sharad Pawar) आणि पवार म्हणजे बारामती (Baramati Loksbha Election) हे राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण. गेली सहा दशकं पवारांनी कुटुंब एकसंघ ठेवलं होतं. या सहा दशकात अनेक जण पवारांना सोडून गेले. पण जेव्हा शरद पवारांना पुतण्या सोडून गेला तेव्हा शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साद घालायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. त्यातच काल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले.
सुप्रिया सुळे-हर्षवर्धन पाटलांची भेट
बारामतीत लोकसभा मतदारसंघाकडे आख्ख्या देशाचे पक्ष लागले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत आहेत. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत तसतशा गाठीभेटी वाढत आहेत. रविवारी सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील एका विवाह प्रसंगी एकत्र आल्याने पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. परंतु अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला.
अजित पवार महायुतीत आले, तरी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार संघर्ष कमी झाला नाही. अंकिता पाटील यांनी आमच्या पाठीत 2009, 2014 आणि 2019 ला खंजीर खुपसला अशी टीका नाव न घेता राष्ट्रवादी वर केली होती. त्यावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष टोकाला गेला होता. त्यातच हर्षवर्धन पाटील आणि आमचे घरगुती संबंध आहेत असं सुप्रिया सुळे म्हणताच अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना सबुरीने घ्या असे सूचना केल्यात.
सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी अजित पवारांची खेळी
ज्या बहिणीला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्याच बहिणीला पाडण्याचा अजित पवारांनी चंग बांधला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांनी दौरे वाढवले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कामाचा विकास रथ देखील फिरत आहे.
सुनेत्रा पवार-संग्राम थोपटे भेट
दोनच दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी भोरच्या थोपटे कुटुंबियांची भेट घेतली. थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी थोपटे कुटुंबियांची भेट घेतली. थोपटे हे काँग्रेसमध्ये आहेत. पण शरद पवार आणि थापटे यांचे संबंध सलोख्याचे नाहीत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी थोपटे कुटुंबयांची भेट घेतली.
भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांसोबत 40 वर्ष काम केलं. शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार चंद्रराव तावरे यांनी केला. 1997 साली त्यांच्यात वितुष्ट आलं आणि तावरे यांनी पवारांची साथ सोडली. चंद्रराव तावरे सध्या भाजपमध्ये आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सध्या विद्यमान संचालक आहेत. त्यानंतर अजित पवारांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत चंद्रराव तावरे काटेवाडी मंचावर दिसले.
राहुल कुल कुटुंबीयांची सुनेत्रा पवारांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राहूल कुल सध्या भाजपमध्ये आहेत. पण राहुल कुल आणि आमचे घरगुती संबंध आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावरून अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत सुळेंवर टीका केली होती.
पृथ्वीराज जाचक यांची शरद पवारांशी भेट
पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनंतर सुनेत्रा पवारांनी जाचक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. जाचकांनी शरद पवारांसोबत 1984 ते 2003 पर्यत काम केलं. छत्रपती सहकारी साखर कारखान्यामुळे जाचक हे पवारांपासून वेगळे झाले होते. पृथ्वीराज जाचक सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत. पृथ्वीराज जाचक हे साखरसंघाचे माजी अध्यक्ष आहेत.
अजित पवार महायुतीत आल्याने बारामतीत लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दौंड, इंदापूर, खडकवासला मतदारसंघात असा संघर्ष आहे. असं असले तरी मोदींच्या विचाराचा खासदार दिल्लीत पाठवायचा आहे, त्यामुळे विधानसभेची चर्चा होईल. पण बारामतीतून महायुतीचा खासदार पाठवण्याची तयारी असल्याचे भाजपचे म्हणणं आहे.
वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं तरी काम करणार नाही
शिवसेना नेते विजय शिवतारे यांची राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीमधून झाली. 2009 आणि 2014 ला सेनेतून विजय शिवतारे यांनी पुरंदर हवेलीचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 2019 साली अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडले. त्यावेळी अजित पवार आणि शिवतारे यांचे संबध बिघडले. पण जोपर्यंत विधानसभेच्या जागांची चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले तरी काम करणार नाही अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली आहे.
या सगळ्या नेत्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. त्यामुळे या नेत्यांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची असणार आहे.
राजकारणात कुणी कायमचा मित्र नसतो तर कुणी कायमचा शत्रूही नसतो. शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यातील सगळ्या नेत्यांनी शरद पवारांसोबत काम केलं आहे तर अनेकांचा अजित पवारांचा संघर्ष झाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात या सगळ्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आता हे नेते साथ कुणाला देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
ही बातमी वाचा: