Indapur : "आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा", अशा आशयाचे बॅनर इंदापुरात (Indapur) झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) अपक्ष लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


इंदापूरची जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला?


सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणार आहेत. त्यामुळे विधानसभेला इंदापूरची जागा कोणाला सुटणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं. 


2019 मध्ये कोणाला किती मतं? 


हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दत्तात्रय भरणे यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. दत्तात्रय भरणे यांनी 114,960 मतं खेचून आणली होती. तर हर्षवर्धन पाटलांना 111,850 मतं पडली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा 3,110 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील संघर्ष गेल्या 5 वर्षात वाढला आहे. इंदापूरमधील नेत्यांचे कार्यकर्ते मला त्रास देतात, अशा आशयाचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. 


काहीही झालं तरी विधानसभा निवडणूक लढवणार, हर्षवर्धन पाटील यांच्या मुलाने दिला होता इशारा 


सध्या आम्ही महायुतीमध्य आहोत. महाविकास आघाडीमध्ये आम्ही होतो, तेव्हा अजित पवार यांनी तीन वेळेस शब्द दिला. मात्र, त्यांनी शब्द पाळला नाही, असं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. शिवाय, तुम्ही विधानसभेला आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करु, असा इशाराही अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. तर काहीही झालं तरी आम्ही इंदापूरची विधानसभा लढवणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या


Devendra Fadnavis on Ladaki Bahin Yojana : सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटच्या नादी लागू नका, लाडकी बहिण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आवाहन