Gujarat Visit of Arvind Kejriwal: गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आतापासूनच या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. केजरीवाल हे सध्या गुजरातमधील सुरतच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते जनतेला संबोधित देखील करत आहेत. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, गुजरातमधील सर्व घरगुती ग्राहकांना या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) सत्तेवर आल्यास दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत मिळेल.


जुनी बिले माफ करण्याचे दिले आश्वासन 


"आम्ही सर्व घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. आम्ही सर्व शहरे आणि गावांमध्ये 24X7 वीज पुरवठा सुनिश्चित करू," असे अरविंद केजरीवाल यांनी सुरत शहरातील पत्रकार परिषदेत सांगितले. केजरीवाल यांनी आश्वासन दिले की, जर त्यांच्या पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळाली तर 31 डिसेंबर 2021 पर्यंतची सर्व जुनी वीज बिले माफ केली जातील. केजरीवाल पुढे म्हणाले, गुजरातमध्ये दोन महिन्यांचे वीज बिल येते. दरमहा 300 युनिटनुसार, 600 युनिट दोन महिन्यांच्या बिलात मोफत उपलब्ध होईल.


भाजपला केलं लक्ष्य 


आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपने यासाठी आपवर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, "जनतेला मोफत रेवडी दिल्याने श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवत नाही. ती तुमच्या मित्र, मंत्र्यांना दिल्याने घडते. श्रीलंकेचे लोक त्यांच्या मित्रांना मोफत रेवडी देत ​​होते. जर त्यांनी ती जनतेला दिली असती तर, जनतेने त्याच्या घरात घुसून त्यांना पळवून लावले नसते.''


इतर महत्वाच्या बातम्या:


उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल तटस्थ राहणार, मार्गारेट अल्वा यांना मतदान न करण्याचा ममता बॅनर्जींचा निर्णय
Presidential Election 2022 : द्रौपदी मुर्मूंच्या विजयाआधीच देशभरात भाजपचं सेलिब्रेशन, राज्यात अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांचा जल्लोष