Presidential Election 2022 : देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय.  जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.   दरम्यान मुर्मू यांच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू आघाडीवर आहेत. यानंतर  देशभर जल्लोषास सुरूवात झाली आहे. तसेच राज्यभर जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे.


दादर, नरिमन पोईंट येथे जोरदार सेलिब्रेशन


मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते, नेते यांनी एकत्र येऊन जल्लोष केला आहे.  आदिवासी ढोल-ताशा पथक  कार्यालयाबाहेर  दाखल झाले आहे.  दादर, नरिमन पोईंट येथे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर देखील जल्लोषाला सुरुवात  झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्ते आणि महिला आनंद साजरा करत आहेत


मेळघाटमध्ये जल्लोष 


 मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या कोटमी या गावामध्ये आदिवासी बांधवांनी जल्लोष सुरू केला आहे.  कोटमी या गावामध्ये आदीवासी बांधवांनी आदिवासी नृत्य करून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु याच या निवडणुकीमध्ये जिंकणार या विश्वासाने खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा आणि त्यांच्या समर्थकांनी मेळघाटमध्ये जोरदार जल्लोष साजरा केलाय..


वर्ध्यात आदिवासी महिलांचा सत्कार


आमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थाबाहेर  आयोजित कार्यक्रमात  आदिवासी महिलांनीही  डान्स केला. आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते जिल्ह्यातील 50 आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. 


जळगावात जल्लोष


जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला  आहे. यावेळी भाजपा आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्षा स साधना महाजन यांच्यातर्फे अभिनंदनचे बॅनर  लावून शुभेच्छा देण्यात आल्या.  भव्य शोभा यात्राही काढण्यात आली या मध्ये मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले आहे


दिल्लीत पोस्टर्स


राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी  पूर्ण होण्याअगोदरच  विजयाचा पूर्ण आत्मविश्वास असल्याने दिल्लीच्या चौकाचौकात द्रौपदी मुर्मु यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागले.