गांधीनगर : विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरु केली आहे. आज दुपारी दोन वाजता भाजपच्या निर्वाचित सदस्यांची एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय.
कोण आहेत नितीन पटेल?
नितीन पटेल हे भाजपचे राज्यातील महत्वाचे नेते असून 2016 साली त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. गुजरात सरकारमध्ये ते 2001 साली अर्थमंत्री होते. नितीन पटेल आतापर्यंत सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. उत्तर गुजरातमधील असलेल्या नितीन पटेल हे 1990 साली पहिल्यांदा आमदार झाले होते.
Vijay Rupani Resign : गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा
केंद्रीय मंत्र्यांचेही लॉबिंग
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री मनसूख भाई मांडविया यांचं नावही चर्चेत असल्याची माहिती आहे. त्यांनी दिल्लीतील नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु केली असल्याच्या बातम्या आहेत. मनसूख मांडविया यांच्याकडे आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा चार्ज आहे. ते गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले असून गेल्या दोन दशकांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत.
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.