बुलढाणा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि शिवसेना शिंदे (Shivsena) गटासमवेत गुवाहटीला गेलेले माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि भाजपा दोघांची सरकारे औरंगजेब च्या प्रवृत्तीचे आहेत, तेव्हा तलवारीने मारत होते आता पेनाने मारतात. तुम्ही जर सरकारचे निर्णय बघितले तर औरंगजेब पेक्षा खराब आहेत, अशा शब्दात महायुती सरकारवर माजी आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी जोरदार निशाणा साधला. तसेच, शरद पवार गटाचे आमदाराच काय शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकमेकांच्या संपर्कात आहेत, भविष्यात काय होईल सांगता येणार नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे आज बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथे कैलास नागरे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सरकार, माध्यमं आणि राजकारण्यांवर संताप व्यक्त केला. बच्चू कडू म्हणाले, काँग्रेस आणि भाजप या दोघांची सरकारे औरंगजेब पेक्षाही वाईट आहेत. त्याकाळी तलवारीने मारायचे आता, हे पेनाने मारतात. या सरकारने शेतकरी व सामान्य जनतेचा आवाज बंद केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय बघितले तर औरंगजेबापेक्षाही बेकार कारभार आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचीच री ओढली आहे.
शरद पवार-अजित पवार एकमेकांच्या संपर्कात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही आमदार हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आमदारच काय शरद पवार आणि अजित पवार हेही एकमेकांच्या संपर्कात आहेत, ते उच्चस्तरीय राजकारण करतात. भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही, असा गौप्यस्फोटच कडू यांनी केला आहे. कडू यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कामराच्यी टीकेवरुन अजित पवारांना टोला
कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेबद्दल जे म्हटलं तें निषेधार्ह असलं, तरी अजित दादा आणि एकनाथ शिंदे तर एकत्र बसले आहेत. अजित पवार पण खोके, गद्दार म्हणायचे, त्यांचं काय? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे. तसेच, राजकारणात या गोष्टी हलक्या फुलक्या म्हणून पुढे जायचं असतं, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका