Girish Mahajan, जामनेर : मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात अतिशय गलिच्छ रस्ते पाहायला मिळाले आहेत. महाजन लिहा तांडा गावात गेले होते. दरम्यान गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.
पाऊस झाल्याने काही ठिकाणी चिखल झाला : गिरीश महाजन
गिरीश महाजन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षाकडून महाजन यांना या मुद्यावरुन टार्गेट केलं जाण्याची शक्यता आहे. या बाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, परिसरात पाऊस झाल्याने काही ठिकाणी चिखल झाला आहे. आपण दुचाकी वरून जात असताना काही जणांनी त्याचा व्हिडीओ काढला असेल. मात्र नागरिकांनी जाब विचारला असे नव्हे. गाव परिसरात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठीच आपण या गावात आज सायंकाळच्या सुमारास गेलो होतो, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
अंबादास दानवे यांची फेसबुक पोस्ट
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब.... जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला, अशा आशयाची पोस्ट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातच अतिशय गलिच्छ रस्ते असल्याने सोशल मीडियावर गिरीश महाजन यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अनेक तरुण महाजन यांना सवाल करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या