मुंबई- लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी सरकारने जोरदार फटका महायुतीला दिला. यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा रोल राहिला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार. त्यामुळेच सध्या त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेला १० पैकी ८ सदस्य निवडून आणले आणि महाविकास आघाडीत आपली रेष मोठी केल्याचं दिसून आलं. यामुळेच आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं वजन वाढल्याचे पाहिला मिळालं आहे. त्यामुळेच आता शरद पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
शरद पवार यांच्या पक्षात नुकतंच कागल विधानसभेसाठी मागील ५ वर्षांपासून तयारी करणारे भाजपचे उमेदवार समरजीत घाटगे यांनी प्रवेश केला. ज्यावेळी हा प्रवेश पार पडला त्यावेळी शरद पवार यांनी घाटगेंना निवडून द्या, त्यांना मंत्री करतो अशी थेट घोषणा केली. त्यानंतर आता भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या वाढायला लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसून येत आहे.
आगामी काळात कोणते नेते तुतारी हातात घेऊ शकतात
१) मदन भोसले- वाई विधानसभा
२) विवेक कोल्हे- कोपरगाव विधानसभा
३) बाळा भेगडे- मावळ विधानसभा
४) जगदीश मुळीक- वडगाव शेरी
५) हर्षवर्धन पाटील- इंदापूर
६) प्रशांत परिचारक- पंढरपूर- मंगळवेढा
७) राजन पाटील - मोहोळ विधानसभेत वर्चस्व
८) दिलीप सोपल- बार्शी
९) रणजीत शिंदे (बबन शिंदे यांचा मुलगा)- माढा विधानसभा
१०) रमेश कदम- मोहोळ विधानसभा
सध्या जरी ही नावं प्रामुख्याने पाहिला मिळत असली तरी लवकरच यामध्ये आणखी काही नावांची भर पडण्याची शक्यता आहे. सध्या नवी मुंबईमध्ये एकहाती सत्ता असणारे गणेश नाईक असोत किंवा फलटण, आसपासच्या विधानसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणारे रामराजे नाईक निंबाळकर असोत ही मंडळी देखील आगामी काळात कोणत्याही क्षणी तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना पाहिला मिळत आहे.
एबीपी माझाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीत ८० ते ८५ जागा मिळाव्यात अशी भूमिका घेतली आहे. या जागांसाठी दिवसेंदिवस इच्छुकांच्या अर्जांची संख्या वाढताना पाहिला मिळत आहे. १२ सप्टेंबर अखेर पक्षाकडे ५१५ जणांनी निवडणूक लढण्यासाठी अर्ज सादर केला आहे.
राज्यात दिवाळीनंतर निवडणुका जाहीर होतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील जोरदार तयारी करत आहे. सध्या पक्षांतर्गत जो सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागांची सर्व्हेची माहिती आली असून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मात्र पुन्हा एकदा प्रचारात पुढे निघून जात असल्याचं पाहिला मिळत आहे