Maharashtra Political Updates: आगामी काळात राजस्थानच्या विधानसभा निवडणुका (Rajasthan Legislative Assembly Election 2023) पार पडणार आहेत. अद्याप निवडणुकांचं बिगुल वाजलं नसलं तरीदेखील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेस (Congress News) सत्ता टिकवण्यासाठी आणि भाजप (BJP) काँग्रेसकडून सत्ता हिसकावून राजस्थानमध्येही कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण राजकीय वर्तुळात सध्या वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. आता राजस्थानचं भवितव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) हातात असल्याचं बोललं जात आहे. कारणंही तसंच आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी आणि राजस्थानमधील एक बडा चेहरा असलेले राजेंद्रसिंह गुढा (Rajendra Singh Gudha) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. 


राजस्थानच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून लाल डायरीची चर्चा भलतीच रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एका लाल डायरीत राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराचा आलेख असल्याचा उल्लेख अमित शाहांनी केला होता. तेव्हापासूनच राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजली होती. हीच लाल डायरी गुढांकडे असल्याचं बोललं जात आहे. आणि हेच राजेंद्रसिंह गुढा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी स्वतः राजस्थानला जाणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी आमदार गुढ यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार असून त्याच कार्यक्रमात काँग्रेसची साथ सोडून राजेंद्रसिंह गुढा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मुख्यमंत्री स्वत: राजस्थानला जाऊन पक्षप्रवेश करणार


लाल डायरीवरून सरकारविरोधात मोर्चा काढणारे बरखास्त मंत्री आणि काँग्रेस आमदार राजेंद्र गुडा लवकरच पक्ष सोडू शकतात. राजेंद्र गुडा 9 सप्टेंबरला शिंदे शिवसेनेत प्रवेश करू शकतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुढा यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी उदयपूरवाटी येथे येत आहेत. त्याच समारंभात गुढा शिवसेनेसोबत नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


शिवसेनेचे राजस्थान प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी ट्वीट करून गुढा 9 सप्टेंबरला पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. सिंघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, 9 सप्टेंबरला राजेंद्र गुढा यांच्या आगमनाने शिवसेनेची ताकद वाढेल, पण ही फक्त सुरुवात आहे. पडद्यामागे 20 विजयी उमेदवार शिवसेनेत येण्यासाठी सज्ज आहेत. यापुढे, करारानुसार भारतीय जनता पक्ष आम्हाला किती जागा देतो? यावर ते अवलंबून असेल, कारण भाजपचे नुकसान होईल, असं कोणतंही पाऊल आम्ही उचलायचं नाही, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


काँग्रेसनंच गुढा यांना केलेलं बडतर्फ 


गुढा यांनी मंत्री असताना जुलैमध्ये विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभेत काँग्रेस आमदारांनी मणिपूर हिंसाचार आणि मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.  पण या मुद्द्यावर बोलताना राजेंद्रसिंह गुढा यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला होता. बलात्काराच्या बाबतीत राजस्थान प्रथम आहे. मणिपूरबद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या घरात डोकावलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी गहलोत सरकारवरच ताशेरे ओढले होते. काँग्रेस आमदारानं आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानं काँग्रेसच्या विधानसभेत अस्वस्थता निर्माण झाली होती. हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गुढा यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. पक्षाकडून बडतर्फ केल्यानंतर गुढा यांनी विधानसभेतच एक 'लाल डायरी' दाखवून आपल्याच पक्षाच्या सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता. 


आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इनकम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. त्या दिवशी राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीबाबत गुढा यांनी गेहलोत सरकारविरोधात सातत्यानं आरोपांची माळच लावली होती.  गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. तेव्हापासूनच भाजपनं सातत्यानं लाल डायरी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यानं लाल डायरीच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारला घेरलं आहे.