जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, यावरून राजकीय वातावरण देखील आता तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. 'संदिपानराव भुमरे तुमची कुठे मध्येच अगरबत्ती ओवाळताय, आपल्याला मराठा समाज कायमचं घरी बसवण्याची जबाबदारी घेणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.


राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. दरम्यान जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यातच मंगळवारी सरकारचा एक शिष्टमंडळ गावात जाऊन धडकलं. मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, संदिपान भुमरे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. बऱ्याच वेळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती या शिष्टमंडळाने केली. दरम्यान, यावेळी बोलतांना संदीपान भुमरे यांनी जरांगे यांना उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली. तसेच मराठा आरक्षण मिळाले नाही, तर जबाबदारी माझी असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. यावरूनच आता अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.


काय म्हणाले दानवे?


अंबादास दानवे  लयांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, 'अहो, संदिपानराव भुमरे तुमची कुठे मध्येच अगरबत्ती ओवाळताय. मला जर उध्दव साहेबांनी सांगितले तर मी मंत्रालयच्या सातव्या मजल्यावरून उडी मारु म्हणनारे, आणि लाचार होऊन तुम्हीच मंत्री पदासाठी शिंदे -फडणवीसांकडे पहिल्या रांगेत उभे होता. आत्ता आरक्षणाची जबाबदारी घेता? अहो पण तुम्हाला कोण विचारत ?, आपल्याला मराठा समाज कायमचं घरी बसवण्याची जबाबदारी देणार आहे, काळजी नसावी. तोपर्यंत तुमचा दळभद्री पणा चालू द्या, असे दानवे म्हणाले.


काय म्हणाले होते भुमरे? 


"मला खात्री आहे. सकारात्मक निर्णय होणार आहे. फक्त सगळ्यांनी शांत रहा, एवढीच आमची विनंती आहे. मी तुम्हाला साहेबांच्या आणि शासनाच्या वतीने सांगतो की, सकारात्मक निर्णय होणार आहे. आपल्या मराठा समाजाच्या बांधवांचा मोठा निर्णय होणार आहे. तसेच चांगला होणार आहे, एवढ तुम्हाला सांगतो. कारण, मी स्वतः समितीत उपस्थित होतो. मला स्वतः मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली गावात यायचं सांगितले आहेत. कुठल्याही परिस्थितीत समाजाला न्याय कसा मिळणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच,  मराठा आरक्षण मिळाले नाही, तर जबाबदारी माझी असा विश्वास मनोज जरांगे यांना देण्याचा प्रयत्न भुमरे यांनी केला.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक; शांतता प्रस्थापित होण्यासाठी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन