यवतमाळः तब्बल 27 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले. मविआमध्ये असताना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस-नेर मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांना कॅबिनेटपद मिळाले आहे.
एका तरुणीच्या मृत्यूमध्ये सामिल असल्याचा आरोप लावून भाजप नेत्यांनी संजय राठोड यांच्यासह मविआ सरकारलाही धारेवर धरले होते. विरोधकांकडून होणाऱ्या सततच्या टीकांमुळे संजय राठोड यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं होतं. मात्र आता भाजपसोबत स्थापन सरकारमध्ये त्यांना पुन्हा कॅबिनेटमंत्रीपदी संधी दिली आहे. संजय राठोड हे 1995-1996 पासून शिवसेनेत असून कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेच्या फळीची घट्ट बांधणी केली. त्यांच्या कार्यालया बघून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राठोड यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड केली. आपल्यावरील बाळासाहेबांचे विश्वास सार्थ ठरवत त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी जीवाचे रान केले होते.
माणिकराव ठाकरे यांचा 22 हजार मतांनी पराभव
राठोड 2002-2003 पासून तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या दारव्हा- नेर मतदार संघात सक्रिय होते. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेत त्यांना तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या दारव्हा- नेर मतदार संघातून निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आली. संधीचे सोने करत राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांचा 22 हजार मतांनी पराभव करुन पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2009मध्येही माजी मंत्री संजय देशमुख यांना 50 हजार मतांनी पराभूत करून दुसऱ्यांदा पुर्नरचनेत दारव्हा- दिग्रस-नेर मतदार सांगातून निवडून आले.
2014मध्ये संजय देशमुखांना दुसऱ्यांदा केले पराभव
संजय राठोड यांनी 2009मध्ये माजी मंत्री संजय देशमुख यांना पराभूत केल्यावर पुन्हा 2014च्या निवडणूकीतही त्यांना पराभूत केले. यानंतर त्यांना महसूल राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळाली. यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे एक वर्ष पालकमंत्री पद सांभाळले, उर्वरित काळात वाशिम जिल्ह्याची पालकमंत्री पद सांभाळले. 2019मध्ये पुन्हा माजी मंत्री संजय देशमुख हे अपक्ष लढले तेव्हाही त्यांना टक्कर देत संजय राठोड विजयी झाले होते. यानंतर त्यांना वनमंत्री म्हणून संधी मिळाली.
राठोडांबद्दल
संजय राठोड यांचा जन्म 30 जून 1971 रोजी पहूर, ता. कळंब- जि. यवतमाळ येथे झाला होता. त्यांनी बी कॉम बीपीएड पदवी घेतली आहे. त्यांच्या वडीलांचे नाव दुलीचंद राठोड तर आईचे नाव प्रेपिला दुलीचंद राठोड आहे. त्यांच्या पत्नीचे नाव शीतल संजय राठोड आहे. तसेत त्यांना दोन मुले असून दामिनी आणि सोहम या दोघांचा समावेश आहे.
वैयक्तीक आरोपांमुळे गमावले मंत्रीपद
वनमंत्रीपदावर असताना संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या मृत्यूमध्ये लहभागी असल्याचे आरोप करण्यात आले. त्यांचे फोटो, व्हिडीओ आणि तरुणीसोबतचे संभाषण आदींची माहिती सोशल मीडियासह माध्यमांवर झळकली. शेवटी विरोधकांकडून होणाऱ्या सततच्या नवीन आरोपांमुळे त्यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं होतं. मात्र आज पुन्हा त्यांना शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेटपदाची जबाबदारी मिळाली आहे.
'टाइमटेबल'द्वारे साधताता संवाद
संजय राठोड यांचे आठवड्याचे टाइमटेबल फिक्स असते. त्यात अपवादात्मक परिस्थितीत बदल होता. मात्र दर सोमवारी ते यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. तर मंगळवार ते गुरुवारी ते मुंबईत मुक्कामी राहून मंत्रालयातील जबाबदारी सांभाळतात. तसेच शुक्रवार ते रविवार ते आपल्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतात. यासोबतच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतात. मतदारसंघातील आणि यवतमाळ जनसंपर्क कार्यालयाचे दिवस हे 'संजुभाऊंची 'ओपीडी' म्हणून परिचित आहे.