Devendra Fadnavis On Shiv Sena Symbol: शिवसेना आणि शिंदे गटात धनुष्यबाणावरून सुरु असलेल्या लढाईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीस यांनी धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच असल्याचे संकेत संकेत यांनी दिले आहेत. दोंडाई येथे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सभेसाठी पोहोचले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना गदा आणि धनुष्यबाणाची भेट देऊन स्वागत केलं. यावेळेस सांकेतिक भाषेत त्यांनी धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे सोबतच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या चांदीचा गदेचाही मार्मिक उल्लेख करत, आता या चांदीच्या गदेद्वारेच सत्ता बदला झाला असल्याचं फडणवीस यांनी म्हणाले. तसेच आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, कुठेही हनुमान चालीसा म्हणता येईल, असं सांगत फडणवीस यांनी प्रखर हिंदुत्वाला महाराष्ट्रात यापुढे प्राधान्य राहील असे संकेतही त्यांनी दिले.
आता गदा चालवण्याची आवश्यकता नाही: फडणवीस
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, ''आता गदा चालवण्याची आवश्यकता नाही. कारण आता हनुमान चालीसा म्हणण्यावर कुठलीही बंदी नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो हनुमान चालीसा म्हणू शकतो. कारण आता हनुमानाची गदा पूजा करण्यासाठीच आपल्याला ठेवायची आहे.''
'आमचं समर्थन धनुष्यबाणासह शिंदे यांना आहे'
हनुमान चालीसावरून फडणवीस पुढे म्हणाले की, ''त्यावेळी मी सांगितलं होतं, आम्ही गदाधारी आहोत आणि समोरचे गधाधारी. कसे गधाधारी आहे, हे सर्वानी पाहिलं. म्हणून त्यावर फार बोलण्याची गरज नाही.'' धनुष्यबाणावर बोलताना ते म्हणाले, ''मुख्यमंत्री शिंदे यांच्या करता तुम्ही (कार्यकर्त्यांनी) धनुष्यबाण माझ्या हाती दिलं आहे. धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग करणार. दोन्ही दावे पोहोचले आहेत. मात्र आमचं समर्थन धनुष्यबाणासह शिंदे यांना आहे. मला विश्वास आहे, सर्वाधिक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आहेत. सर्वाधिक पदाधिकारी त्यांच्याकडे आहे. सर्वाधिक कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण मी त्यांच्या हातात देणार आहे, तसेच सर्व सुनावणी पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय येईल तेव्हा मला पूर्ण अपेक्षा आहे की, धनुष्यबाण त्यांच्याच हातात येईल.''
इतर महत्वाच्या बातम्या:
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी घोषणा करुनही आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?
राज्यपालांच्या वक्तव्यावर गुजराती-राजस्थानी व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं? त्यांचे योगदान काय? इतिहास काय सांगतो?