Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्च्याकडून आज 42 जणांनी रक्ताने पत्र लिहले असून, ते मुख्यमंत्री यांना दिले जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत 42 जणांनी बलिदान दिले असून, त्यामुळे 42 रक्ताने लिहलेले पत्र मुख्यमंत्री यांना देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे. 


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्च्यावतीने उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहलेले 42 पत्र दिले जाणार आहे. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आतापर्यंत 58 मोर्चे काढले आहे. तर याच आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत 42 जणांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे 42 रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना देऊन आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणार असल्याची माहिती केरे यांनी दिली आहे. 


अनेक मूक मोर्चे काढून सुद्धा आम्हाला आरक्षण मिळत नाही. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये येणार आहे, त्यामुळे त्यांना आम्ही रक्ताने लिहलेले पत्र देणार आहोत. सद्या आम्ही शांतपणे आमच्या मागण्या करत आहोत, मात्र यापुढील आंदोलन आक्रमक असतील, असा इशारा सुद्धा यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आला आहे.  


ईडब्ल्यूएस आरक्षण हायकोर्टानं रद्द केलं...


आधीच कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला असतांनाचं, एसईबीसी प्रवर्गातंर्गत लागू करण्यात आलेलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षण सुद्धा हायकोर्टानं रद्द केलं आहे.  त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारनं जुलै 2021 मध्ये काढलेला अध्यादेश (जीआर)  शुक्रवारी मुबंई उच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. सोबतच महावितरणच्या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या एसईबीसी प्रवर्गातील (मराठा) उमेदवारांच्या विनंती याचिकाही हायकोर्टानं फेटाळून लावल्या आहे. त्यामुळे आता महावितरण नोकर भरतीत मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या 10 टक्के आरक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे.