Aurangabad News: नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, त्यांच्यावर टीकाही केली जातेय. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपालांच्या विधानाचे निषेध करण्यासाठी तब्बल 10 लाख पत्र राज्यपालांना पाठवले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून राज्यपाल लवकर बरे होतील, असा खोचक टोला या पत्रातून लावला जाणार आहे. युवक काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यावर तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. तर राज्यपाल महोदय यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने त्यांना 10 लाख पत्र पाठवले जाणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी दिली आहे.
काय असणार पत्रात...
राज्यपाल यांना पाठवल्या जाणाऱ्या पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, 'आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुष यांचा अवमान करीत आहात. महाराष्ट्र या राज्याचा एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे की, आपण महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की, महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी. तरी आम्ही सर्वजन अशी प्रार्थना करतो की, आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हाला. राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेताना आपण जी घटनात्मक शपथ घेतली होती तीचे प्रामाणिकपणे पालन कराल. तरी आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हिच माफक अपेक्षा, असल्याचं या पत्रात म्हंटले आहे.
राष्ट्रवादी रस्त्यावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मुंबईतील हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी दुपारी 3 वाजता निदर्शने केली जाणार आहे. तर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुद्धा राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.