Eknath Shinde On Maharashtra Cabinet मुंबई: मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीमधील अनेक इच्छुक आमदारांचा अपेक्षाभंग झाला. संधी न मिळू शकलेले शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यासह अनेकांनी उघडपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली. दरम्यान विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. 


काही वेळा पदे येतात व जातात, मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्त्वाचे आहे. जसे मला 'लाडका भाऊ' हे मोठे पद वाटते, त्याचप्रमाणे विजय शिवतारे यांना ' शिंदे यांचा विश्वासू सहकारी' हे पद महत्त्वाचे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. या परिवारापासून कुणीही वेगळे होणार नाही. पक्षात कुणीही नाराज नाही, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


विजय शिवतारे काय म्हणाले?


मी नाराज नव्हतो, घरच्यांना अपेक्षा होती आणि कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते, म्हणून थोडा भावूक झालो होतो, असं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.  एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी हे पद मला जास्त जवळचे आहे. घरच्यांना अपेक्षा होती. 375 गाड्या दहा तास प्रवास करून नागपूरला आल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी थोडा भाऊ झालो आणि अनेक गोष्टी बोलून गेलो पण माझ्या मनात असे काही नाही. पुढील काळात एकनाथ शिंदे जे पद देतील ते मला मान्य असेल, असं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले. सगळ्या आमदारांची नाराजी आता दूर झाली आहे, अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला त्यांना देखील मान्य आहे. आम्हाला देखील राजीनामा देण्यास सांगितला तर आम्ही लगेच देऊन टाकू, असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले. तसेच, खातेवाटप आज किंवा उद्या जाहीर केले जाईल असे मला वाटते, काही अडलं नसून सर्व फायनल झालेले आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले. 



संबंधित बातमी:


Santosh Deshmukh Murder Case : माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारलं, तशीच कठोर शिक्षा आरोपींना द्या, संतोष देशमुखांच्या मुलीने टाहो फोडला