हिंगोली : लोकसभा निवडणुकांच्या (Lok sabha Election 2024) अनुषंगाने प्रचारसभांचा धडाका सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तर, शिंदे गट व भाजपाकडूनही उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यात येत आहे.परभणी येथील सभेतूनही उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर हल्लाबोल केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) लक्ष्य केले होते. त्यानंतर, आज हिंगोलीतील सभेतून मुख्यमंत्री शिंदेनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी असल्याचा प्रखर बाण शिंदेंनी हिंगोलीतील सभेतून चालवला. 


हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आज महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच आमदार राजू नवघरे यांच कौतुक करताना या मतदारसंघात असेलेले प्रश्न सोडवायला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच, वसमत येथे एमआयडीसी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.


महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हा शेतकऱ्याचा मुलगा असल्याची साद मुख्यमंत्र्यांनी मतदारांना घातली. महायुतीमध्ये मी आणि देवेंद्रजी काम करत असून शेतकऱ्यांसाठी योजना काढल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे. काल रात्री गारपीट झाली. सध्या निवडणूका आहेत, मात्र मी स्वतः नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्याचे शिंदेंनी म्हटले. 


बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी


महाविकास आघाडी नें 4 सिंचन प्रकल्प मंजूर केले, तर आपण 122  सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. 60 वर्षात गरिबी हटाव असा नारा होता. मात्र, गरिबी हटली नाही. पण, मोदी सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणल्याचं शिंदेंनी सांगितलं. तसेच, समोरच्या लोकांकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, बाप एक नंबरी अन् बेटा 10 नंबरी असल्याची बोचरी टीका यावेळी, एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर केली. तर, जे म्हणत होते सरकार पडणार त्यांना खरा ज्योतिष मिळाला नाही, असे म्हणत संजय राऊतांवरही निशाणा साधला.कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, म्हणूनच निवडणुकीत बाबुराव कदम विरोधकांच्या नाकावर टिचून जिंकणार, असेही शिंदेंनी म्हटले. सोयाबीन कापूस दर कमी झाले, त्यासाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना तो लाभ मिळेल.


संविधान बदलणार नाही


मोदी सरकार आल्यास संविधान बदलले जाणार अशा थापा विरोधक मारत आहेत, पण मोदीजीनीं सांगितलय की जब तक सूरज चांद रहेगा, तोपर्यंत संविधान राहील, असेही शिंदेंनी म्हटले.काँग्रेसने बाबासाहेब आंबडेकरांचा पराभव केला. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, काँग्रेस हे जलळं घर आहे. म्हणूनच, महाविकास आघाडीत आम्ही उठाव केला. कारण, महाराष्ट्रतील जनतेचा विश्वासघात केला जात होता. घरात बसून सरकार चालवता येत का?, फेसबुक live वरून सरकार चालवता येत नाही, असेही शिंदेंनी म्हटले.  


मराठा आरक्षणाची शपथ पूर्ण केली


मराठा आरक्षण गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातात होतं, त्यांनी ते दिलं नाही. याउलट मराठा मुक मोर्चा म्हणून टिंगल केली गेली. आरक्षण टिकू नये म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेली. पण, आमचं सरकार हे आरक्षण टिकवून दाखवणार. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम करणारं हे सरकार आहे. मराठा आरक्षणासाठी मी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती पूर्ण केल्याचेही शिंदेंनी म्हटले. 


काँग्रेसने मुस्लिमांचा वापर केला


विरोधकांकडून मुस्लिम समजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, आमच्यकडे भेदभाव नाही, म्हणूनच आम्ही अब्दुल सत्तार यांना मंत्री केलं. सध्या, दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे.काँग्रेसने दलित आणि मुस्लिम यांचा केवळ वोट बँक म्हणून वापर केला. आम्ही धनगर समाजामधून महादेव जानकर यांना तिकीट देऊन धनगर समाजाला न्याय दिला.


आदित्य ठाकरेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ''जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे. कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही, काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची. मला जास्त बोलायला भाग पाडू नये.लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर  ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही,'' असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.