कोल्हापूर: देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरला, असे वक्तव्य रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवारांसारख्या (Sharad Pawar) माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार तुमची जात वेगळी असतील, तुमचं नाव फडणवीस असतं तर या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही हुंगले नसते. परंतु, देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की, तो शरद पवार यांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवार यांना खोटं बोलत रेटून चालावे लागत आहे, असे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहील. आम्ही सर्व लहान घटक पक्ष भाजपसोबत आहोत. कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत, सगळे अलीबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीला या निवडणुकीत मुठमाती मिळणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळेल: सदाभाऊ खोत
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल, असं चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
राजकारणात चढउतार, उन्हाळा-पावसाळा असतो: सदाभाऊ खोत
मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. चळवळीतले सर्व चढ उतार पाहिले आहेत. कधी मी आमदार, मंत्री होईन असं वाटलं नव्हतं. मी आमदारकीचे शिवार बघितलं, मंत्रीपदाचं शिवार बघितलं, मग माझ्या लक्षात आलं शेताभातातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो, तसं राजकारणातल्या शिवारात देखील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतो. राजकारणात हिवाळा आला की गारव्याला लोक येतात, उन्हाळा आला की गडी पळून जातात आणि पाऊस लागला की नाचायला लागतात, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
आणखी वाचा