नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी एनडीए आघाडीच्या एकूण 72 मंत्र्यांचा शपथविधीही संपन्न झाला. मात्र, या एकूण 72 जणांमध्ये महाराष्ट्रातील शपथ घेणाऱ्या खासदारांची संख्या केवळ सहा इतकी होती. सत्तास्थापनेसाठी भाजपला तेलुगू देसम (TDP) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड या पक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे एनडीएच्या मंत्रिमंडळात साहजिकच  तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांच्या पक्षाला झुकते माप मिळाले आहे. महाराष्ट्रातून भाजपच्या चार खासदारांनी शपथ घेतली. एक राज्यमंत्रीपद रामदास आठवले यांना देण्यात आले. परंतु महाराष्ट्रात मोठी जोखीम पत्कारुन भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेची बोळवण अवघ्या एका राज्यमंत्रीपदावर करण्यात आली आहे. तर अजितदादा गटाला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष याबाबत प्रसारमाध्यांसमोर आम्ही संतुष्ट करत असले तरी साहजिकच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे नाराजीचे वातावरण आहे. या शपथविधीनंतर एका गूढ व्यक्तीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एक फलक लावला आहे. या फलकाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.


महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या फलकावरील मजकूर लक्ष वेधून घेणार आहे. शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील करा. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, असा मजकूर फलकावर लिहण्यात आला आहे. हा फलक नेमका कोणी लावला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. फलकाच्या खालच्या बाजूला 'महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेनाप्रेमी', असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याचे आवाहन करणारी ही व्यक्ती कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकत्र करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात का आणि या सगळ्यामागचा सूत्रधार कोण आहे, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 


शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली?


एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यात रविवारी शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. शिंदे गटाने लोकसभेच्या 7 जागा जिंकल्या होत्या.  तर बिहारमध्ये लोकसभेच्या चार जागा जिंकणाऱ्या चिराग पासवान यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. याशिवाय, अवघा एक खासदार निवडून आणणाऱ्या हिंदुस्थान आवाम मोर्चाच्या जितनराम मांझी यांनाही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. मात्र, शिंदे गटाची बोळवण राज्यमंत्रीपदावर करण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


आणखी वाचा


अजित पवार,एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित; नकली शिवसेनेला राज्यमंत्रीपद फेकलं, अजित पवारांना भोपळा: संजय राऊत