मुंबई : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात (Modi Cabinet) अजित पवारांच्या (Ajit Pawar)  गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्याने विरोधक  सडकून टीका करत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील निशाणा साधला आहे. अजित पवारांना भोपळा मिळाला अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 


संजय राऊत म्हणाले,  काल नरेंद्र मोदींनी दिल्लीत शपथ घेतली. हे भाजपचे किंवा मोदींचे सरकार नाही. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवले आहे. या दोन टेकू महत्त्वाचे आहे. एक चंद्राबाबू आणि एक नितीश बाबू... या दोन बाबूंचा इतिहास सर्वांना महित आहे. 


पियूष गोयल स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री : संजय राऊत


शपथविधीमध्ये महाराष्ट्रला काय मिळाले? तर पियूष गोयल मंत्री झाले. ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे, व्यापाऱ्यांचे मंत्री आहे. अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आहे,  नकली सेनेला एक राज्यमंत्री फेकलं आहे. अर्थात कोणी गुलामगिरी करण्याचे ठरवले असेल.  गुलामांना वापरून महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान पायदळी तुडवायचा ठरवेल असेल तर ते स्वत:ला तुडवून घेत आहेत, असे  संजय राऊत म्हणाले.  


एनडीए सरकार म्हणजे बैलाला रेडकू झालेले सरकार : संजय राऊत


नवीन सरकारबद्दल लोकांमध्ये अजिबात उत्साह नाही. हे ओढून ताणून आलेले सरकार आहे. बैलाला रेडकू झालेले सरकार आहे. लोकांचा सरकारवर विश्वासच नाही. मोदींचा मुखवटा फाटला, भाजपला बहुमत नाही. इकडून तिकडून गोळा करुन सरकार बनवले आहे.  


हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांच्या शपथविधीला इंडिया आघाडीने का जावे? राऊतांचा सवाल


 मोदींचा लोकशाहीवर विश्वास नाही. मोदींनी सातत्याने लोकशाहीचा गळा घोटला. मोदी प्रधानमंत्री असताना त्यांच्यासमोर 150 खासदारांचे निलंबन केले. अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांच्या शपथविधीला इंडिया आघाडीने का जावे? खर्गे हे विरोधीपक्ष नेते आहेत त्यामुळे ते गेले. खर्गेंनी जावे आणि इतरांनी दूर राहावे हा सामुदायीक निर्णय होता. 


संजय राऊत म्हणाले, काल शपथविधी होत असताना भाविकांच्या बसवर हल्ला झाला. त्यावर अजून नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून संवेदना व्यक्त होताना दिसत आहे. अमित शाह निवडणूक काळात वारंवार म्हणत होते, आम्ही जम्मू काश्मीरवर नियंत्रण मिळवले. जम्मू काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापीत केली. पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिले हे दुर्दैव आहे की, आम्ही अजून आहोत. सरकार अपयशी ठरले आहे.