Eknath Shinde : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील (Mahayuti) खदखद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. रायगडचे पालकमंत्रिपद अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना देण्यात आले होते, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे होते. मात्र, रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यातच आभार दौऱ्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 14) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठे सुतोवाच केले आहे.
एकीकडे सिंहस्थाच्या तयारीला वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून गती दिली जात असताना नाशिकचा पालकमंत्री का ठरत नाही, असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. याबाबत ते म्हणाले, पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील. आजच्या आढावा बैठकीला भुसे उपस्थित होते. यापूर्वी त्यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिलेच आहे. गिरीश महाजन हे सध्या कुंभमेळा मंत्री म्हणून काम पाहत आहेत, असे सांगत अप्रत्यक्षपणे दादा भुसे हेच पालकमंत्री होतील, असे सूतोवाच केले.
एकनाथ शिंदेंकडून दादा भुसेंचे कौतुक
शिक्षणमंत्री म्हणून दादा भुसे चांगले काम करीत असल्याचे गौरवोद्गारही शिंदे यांनी यावेळी काढले. केशव गावित या शिक्षकाने विद्यार्थ्यांना असे काही घडवलेय की हा चमत्कारच म्हणावा लागेल. हिवाळी शाळा हा चमत्कारच म्हणायला हवा. त्यामुळेच शाळेसाठी चांगली इमारत बांधण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
यानंतर नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या आभार सभेतून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अडीच वर्षाच्या कालावधीत झालेले राजकारण आणि विकासकामांची गती महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु, विरोधक केवळ गद्दार आणि खोके एवढेच बोलत असून, त्यांच्याकडे दुसरे काहीही भांडवल नाही. एक-एक जण सोडून जात आहे. पण यांचे मात्र, आमचा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला हेच चालू आहे. अडीच वर्षे महाराष्ट्रात सर्व बंद करून ठेवले होते. आपण ते मुक्त केले. सुंभ जळाला असला तरी पीळ काही जाईना अशी स्थिती विरोधकांची झाली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
आणखी वाचा