Raj Thackeray MNS : राज्यात पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक आगामी निवडणपकीआधी मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. अशातच विधानसभेवेळी मोठा धक्का बसलेल्या मनसेला आता पालिका निवडणुकीच्या तोंडावरती मोठी गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजप मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मनसेचे 20 पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला नाशिकमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत असणारे मनसैनिक पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार असल्याने ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. मागील महिन्यात राज ठाकरेंनी नाशिकमध्ये येऊन पदाधिकारीची भेट घेतली होती, मात्र, तरीही पदाधिकारी आज दुपारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये एकेकाळी मनसेची मोठी ताकद
नाशिक एकेकाळी मनसेचा गड मानला जात होता. राज ठाकरेंनी मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये नाशिककरांनी मनसेला चांगली साथ दिली होती. पण 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये मनसेला गळती लागयला सुरूवात झाली. नाशिकमधील मनसेची ताकद कमी होऊ लागली होती. पक्ष स्थापन झाला तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेला सत्ता मिळवता आली आहे.
2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातून मनसेचे 13 आमदार निवडून आलेले होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून मनसेचे एकूण तीन आमदार निवडून आले होते. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरासब नाशिकमध्येही मनसेची ताकद कमी होऊ लागली. 2014 त्यानंतर 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
पक्ष स्थापनेपासूनचे पदाधिकारी भाजपच्या गळाला
नाशिकमध्ये भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज नाशिकमधील मनसेचे 25 ते 30 पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडणार आहेत.आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच मनसेला गळती लागली आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर गळती
काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी नाशिक दौरा करत डॅमेज कंट्रोल थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. बैठका घेतल्या होत्या. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर देखील पक्षातील गळती सुरूच आहे. पक्षातील माजी नगरसेवकांसह आता पदाधिकाऱ्यांची देखील मनसेला सोडचिठ्ठी देणार आहेत.