Dhananjay Munde Suresh Dhas Meet: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात सुरेश धस (Suresh Dhas) यांची आक्रमकता गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रानं पाहिली. आकाचा आका म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरीस आणण्याचा प्रयत्न केल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलं. पण याच आक्रमक सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांचीच भेट घेऊन खळबळ उडवून दिली.
एबीपी माझानं दिलेल्या या बातमीवर खुद्द सुरेश धस यांनीच शिक्कामोर्तब केलंय. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलं. धनंजय मुंडेंवर डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर धस त्यांना भेटायला गेले. तब्येतीची विचारपूस करण्यात काहीच गैर नसल्याचं धस यांचं म्हणणं आहे. पण मग त्यांनी केलेल्या आरोपांचं काय?, दोघांमध्ये आता समेट झाला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या या भेटीवर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत कल्पना नाही. न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढत आहोत. मात्र असे असताना काही लोक वेगळी भूमिका घेत असतील तर ते दुर्दैवी आहे. सुरेश धस यांनी अचानक धनंजय मुंडेंची भेट घेणे आमच्यासाठी धक्कादायक आहे, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
धनंजय मुंडेंच्या ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी भेटलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात गैर नाही.संतोष देशमुख प्रकरण व तब्येतीची विचारपूस करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परवाच्या दिवशी भेटलो...भेटीनंतर बाहेर आल्यावर काय केलंय, हे तुम्हाला माहिती आहे. मुंडेंना रात्रीचं त्यांना दवाखान्यात नेले होते. मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं व न घेणं याचा अधिकार अजित पवारांचा आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. तसेच माझा लढा सुरुच राहणार आहे, असंही सुरेश धस यांनी सांगितले.