Maharashtra Budget 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2024) आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) मांडला. विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. अर्थसंकल्पावरून भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. 


मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अजूनही एकनाथ खडसे हे वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला डिवचले आहे. 


नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार?


एकनाथ खडसे म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला आहे. वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. घोषणा चांगल्या आहेत. मात्र आता वेळ नाही. सध्या राज्य सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार? असा टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. 


एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांसमोर खदखद 


दरम्यान, एकनाथ खडसे, भाजप आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या चर्चेचा व्हिडिओ नुकताच समोर आला. यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसळ यांच्या बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. 


खडसेंची भाजपमध्ये घरवापसी कधी? 


काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि एकनाथ खडसेंनी भेट घेतल्याने एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.