मुंबई :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी संत तुकारामांच्या (Saint Tukaram) अभंगानं अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. आषाढी वारीतील (Ashadhi Wari) दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देणे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. 


संत तुकाराम महाराजांच्या अभंगानं सुरुवात : 


उदंड पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ||ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे || ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे || तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे | पंढरी निर्माण केली देवे ||  अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं वाचन करुन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी बोला पुडंलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.  



महाराष्ट्राचं अराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीहून निघेल. हजार वर्षाची परंपरा असलेल्या वारीशी वारकऱ्यांची नाळ जोडलेली आहे. महाराष्ट्राची नाळ वारकरी भक्तिमार्ग जोडलेली आहे. याची जाणीव असल्यानं महाराष्ट्राची ओळख म्हणून पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवत आहोत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 


निर्मल वारीसाठी 36 कोटी71 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आणि आळंदी या मार्गावरील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा देण्यासाठी, पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी वारकरी व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ  स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं अजित पवार म्हणाले. 


संबंधित बातम्या :


Budget Session 2024 Live Update : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार


पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली