मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील महायुतीत (Mahayuti) काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेण्याची काहीही गरज नव्हती, असे म्हणत भाजपच्या नेतृत्वाला प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे महायुतीचा मोठा पराभव झाल्याची टीका महायुतीमधील काही नेत्यांकडून खासगीत केली जाऊ लागली. तर, राष्ट्रवादी आणि भाजप आमदारांमध्येही थेट खटके उडल्याचं पाहायला मिळालं. त्यात, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात शाब्दिक चकमक झाली होता. आता, महायुतीतील या दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाला आहे. 


पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन भाष्य करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरुन राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने आले होते. मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट टीका केली. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच पुण्यात ड्रग्ज फोफावलंय, असा गंभीर आरोपही मिटकरींनी केला होता. त्यानंतर, भाजपकडून प्रवीण दरेकरांनी अमोल मिटकरींना सुनावलं होतं. मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, असा सल्लाच दरेकरांनी दिला होता. त्यानंतर, दरेकरांनीच तोंडाला आवर घालावी, असा पलटवारही मिटकरींनी केला होता. त्यामुळे, भाजप-राष्ट्रवादीतील हा सामना राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला. आता, दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याची माहिती आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये बैठक होऊन दोन्ही नेत्यांची समजूत घालण्यात आली आहे. 


बैठकीत दोन्ही नेत्याचं मनोमिलन


भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात अखेर समेट झाला. प्रविण दरेकर यांचा वडीलकीच्या नात्याने अमोल मिटकरी यांना सल्ला देण्यात आला होता. महायुतीत कोणत्याही प्रकारे वितुष्ट येईल, असा प्रकार व्हायला नको. आगामी निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जायचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे महायुतीला बाधा आणणारी वक्तव्ये नकोत, असे दरेकरांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांच्याकडून देखील वडिलकीचा सल्ला ऐकण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. या बैठकीवेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते. महायुतीत आता तुम्ही संजय राऊत होऊ नका असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांच्याकडून अमोल मिटकरींना देण्यात आला आहे.


हेही वाचा


पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली