मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चार वर्षांपूर्वी भाजपला (BJP) सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता. भाजप सोडताना एकनाथ खडसेंनी तुम्ही ईडी (ED) लावली तर मी सीडी (CD) लावेन, असा इशाराच भाजपला दिला होता. यानंतर अनेकदा एकनाथ खडसे यांनी वेळ आल्यावर सीडी दाखवेन, असे वक्तव्य केले होते. आता एकनाथ खडसे यांनी सीडीचं नेमकं काय झालं? याबाबत त्यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.  


जेव्हा तुमच्यावर खूप आरोप होत होते. तेव्हा तुम्ही सांगितले होते की, तुमच्याकडे खूप सीडी आहेत. ती तुम्ही वेळ आल्यावर बाहेर काढणार, या सीडीची महाराष्ट्रातील जनता वाट बघत आहे. सीडी कधीपर्यंत बाहेर येणार, असे विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, त्यांनी ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं होतं. मी यमक जुळवण्यासाठी बोलतो होतो. पण, माझ्याकडे काही कागदपत्र व्हिज्युअल होते.  


मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती


एका मुली सोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. पण, नंतर मला समजले नाही की, मोबाईल मधील क्लिप कशी डिलीट झाली. मी मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो की, माझ्याकडे क्लिप होती. पण ती कशी गेली हे मला माहिती नाही. भाजपामध्ये असताना मी भाजपच्या काही वरिष्ठांना ती क्लिप दाखवली होती. दिल्लीच्याही काही नेत्यांना मी ती क्लिप दाखवली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. 



'त्या' व्यक्तीला मॅनेज केले 


ती क्लिप कोणत्या पातळीवरील नेत्याची होती, असे विचारले असता जे तुम्हाला नाव माहिती आहेत त्यातीलच एक नाव होतं, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  तर ज्यांनी तुम्हाला क्लिप पाठवली त्यांच्याकडे ती क्लिप अजूनही असेल असे विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे क्लिप आहे. परंतु, आता त्या व्यक्तीला मॅनेज करण्यात आले आहे. किती रुपये दिले हे माहित नाही. पण तो माणूस आता त्यांच्याकडे आहे, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे


Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...