गोंदिया: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. अनेक आमदार, नेते घरवापसी करत असल्याचं चित्र आहे, अशातच गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांनी आज एबीपी माझाशी बोलताना भाजप सोडण्याचं कारण देखील सांगितलं आहे.
मी भाजपमध्ये असताना भाजपचे नेते मला सोडून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांना अधिक महत्व देत असल्याने मला भाजप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता गोंदिया विधानसभेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात आज काँग्रेस शक्तीप्रदर्शन करून गोपालदास अग्रवाल यांचा पक्षप्रवेश करून घेत आह. एकप्रकारे काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात करत आहे, अशी चर्चा वर्तवली आहे.
भाजपमध्ये असलेले माजी आमदार गोपाल अग्रवाल (Gopaldas Agrawal) यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज (13 सप्टेंबरला) काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली होती. गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये दाखल झाले होते.
भाजपला खिंडार; दोन महिन्यात आणखी एका माजी आमदाराचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीपुर्वी माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर पुन्हा एक माजी आमदार आणि भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झाले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.