वर्धा: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. तर अनेक जण आपापल्या मतदारसंघावर दावा करताना दिसत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी देवळी विधानसभा क्षेत्रात स्वर्गीय प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे. 


चारुलता टोकस माजी राज्यपाल प्रभा राव यांच्या कन्या आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढली आहे. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे(MLA Ranjit Kamble) यांना आव्हान देत देवळी विधानसभा मिळावी यासाठी चारुलता टोकस (Charulata Tokas) यांनी काँग्रेसकडे अर्ज दाखल केला आहे. टोकस यांच्याकडून देवळी विधानसभेवर दावा केला गेला आहे. तर आमदार रणजित कांबळे यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, तर उमेदवारीसाठी आता पुन्हा एकदा एकाच घरात रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. 


चारुलता टोकस आणि रणजित कांबळे हे बहीण-भाऊ आहेत. त्यामुळे वर्ध्याच्या देवळी मतदार संघात बहीण भावात उमेदवारीसाठी रस्सीखेच पहायला मिळते आहे. चारुलता टोकस (Charulata Tokas) यांनी कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करून मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्या काँग्रेसच्या विविध आंदोलनात देखील सक्रिय राहिल्या आहेत. त्या या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून तयारी करत आहेत. 


धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने 'दादां'ना मोठा धक्का दिला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी 'घड्याळ' सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देऊ, असा पवित्रा धर्मरावबाबांनी घेतला होता. मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केलं आहे. त्यामुळे बापलेक आमनेसामने आले आहेत. तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडिल धर्मरावबाबा आत्राम यांना थेट इशारा दिला आहे.