Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा अखेर राजीनामा; सरकारची जेन-झी समोर माघार, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना काय म्हटलं?
Dharmendra Pradhan Resign: एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया असते, यावर त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे.

Dharmendra Pradhan Resign: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resign) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्याकडे सोपवला आहे. 'NEET-UG' परीक्षेत झालेल्या गोंधळावरून देशभरात सुरू असलेला विवाद आणि जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resign) यांनी सोशल मीडियावर याची घोषणा करत राजीनामा देण्यामागील कारणही स्पष्ट केले आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले की, गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळापासून ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिले आहेत. एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया असते, यावर त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे असंही प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय.(Dharmendra Pradhan Resign)
Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यात नेमकं काय म्हटलंय?
Union Education Minister Dharmendra Pradhan resigns.
— ANI (@ANI) July 25, 2026
"...To ensure that anti-national elements are not benefitted by the situation at Jantar Mantar and across the country, that the nation remains united, students in India do not get tangled in legal complexities and focus on… https://t.co/sbtiMMhrgp pic.twitter.com/DPdZwn8q7i
माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,
मी गेल्या ४ दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.
परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG च्या परीक्षेत अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तत्काळ दखल घेत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनरुपरीक्षेची तारीख घोषित केली. यासोबतच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी 'संपूर्ण सरकार दृष्टिकोन' (whole of government approach) ठेवून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकारे, विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.
पहिल्या दिवसापासूनच मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. परीक्षा माफियामुळे आपण कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याची शक्यता खराब होऊ देणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा संकल्प होता.
१६ जुलै रोजी घोषित झालेला नीट-यूजीचा (NEET-UG) निकाल समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले.
परंतु या कालावधीतही अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मन अत्यंत व्यथित झाले.
मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारा राहिलो आहे आणि तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने व अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे. ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकारसुद्धा आहेत.
गेल्या १० दिवसांचा घटनाक्रम पाहून माझे मन दुःखी आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही.
भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे.
देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात फसू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे.
जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात घालवावा आणि करिअर घडवण्यावर भर द्यावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे.
मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सातत्याने मिळालेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले त्या सर्व व्यक्तींचेही आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी यासाठी सदैव समर्पित राहीन.
प्रभू श्री जगन्नाथजींच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशाची जनता आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी स्वतःला समर्पित ठेवीन.
आपला,
धर्मेंद्र प्रधान
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















