Maharashtra Vidhansabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. काल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आरएसएसने भाजपला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. 


निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये. भाजपच्या जुन्या कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको, अशा सूचना नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांच्यासोबतच्या बैठकीत भाजपला सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे संगठन कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपच्या तयारी आणि नियोजनाचा आढावा घेत आहे. यामध्ये काल (10 ऑक्टोबर) नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील तयारी, नियोजन, सामाजिक समीकरण आणि करावयाच्या कामांचा आढावा संघाकडून घेण्यात आला. 


भाजप अन् आरएसएसच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?


- निवडणुकांच्या दृष्टीने जातीय समीकरण जुळवताना भाजपने मूळ हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जाऊ नये अशी सूचना संघाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.


- भाजपने उमेदवारी कुणाला द्यावे तो पक्षाचा प्रश्न आहे. मात्र मूळ कॅडरकडे दुर्लक्ष नको अशी अपेक्षा संघाने व्यक्त केल्याची माहिती आहे. 


- समाज माध्यमांवर केवळ लाईक करून चालणार नाही. त्यावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवे. लोकसभेच्या वेळेला विरोधकांकडून आरक्षणाबद्दल जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अशा विषयांना तथ्यांवर आधारित उत्तरे देत जनतेतील संभ्रम दूर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना देखील संघाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.


- लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होते, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झाले. म्हणजेच भाजपचा मतदार असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात मतदान करायला बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदानकेंद्रांपर्यंत नेता आले नाही. त्यामुळे मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदानाचा टक्का वाढवा, असे ही संघाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.


गेले दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप-


गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संबंधित बातमी:


Gopichand Padalkar : शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरड्या सापासारखी : गोपीचंद पडळकर