NCP Sharad Pawar , अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यात आज (दि.10)  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून पायउतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केलं आहे. 


विश्वास न घेता पदावरुन काढलं, प्रदीप राऊत यांचा आरोप 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदार संघाची प्रमुख जबाबदारी होती. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार ही निवडून आले. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढून त्यांच्यावर प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. मला विश्वासात न घेता आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढलं, अशी नाराजी प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली.


पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अवमान असल्यामुळं मी राजीनमा देतोय : प्रदीप राऊत 


आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला, त्यासाठी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विधानसभेचे माजी उपसभापती शरद तसरे, प्रकाश बोंडे हे नेते जबाबदार असल्याचा आरोपही प्रदीप राऊत यांनी केला. कुठलंही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अवमान असल्यामुळं आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत, असं प्रदीप राऊत यांनी सांगितलं. प्रदीप राऊत यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष किशोर बर्डे, सामाजिक न्याय विभागाचे सुनील कीर्तनकार आदी पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. 


दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चांगलं यश मिळवलं. त्यानंतर अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कागलमधील नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. तर काही नेते अजूनही पक्षात प्रवेश करण्याचा मार्गावर आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर 14 तारखेला शरद पवारांकडे घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे देखील राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. त्यांनी शरद पवारांची दोन वेळेस भेट घेतल्याचेही सांगितले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Gopichand Padalkar : शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरड्या सापासारखी : गोपीचंद पडळकर