Dhule Lok Sabha 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघातून (Dhule Lok Sabha Elections 2024) महायुतीकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून कोणता उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवला जातो याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, काल वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीमुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरही राजकीय समीकरणे आणखीन बदलणार असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसणार असून त्याचा फायदा भाजपला देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम उमेदवार दिल्याने काँग्रेस ही जागा शिवसेनेला देणार असल्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.
कोण आहेत अब्दुल रेहमान?
अब्दुल रहमान यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले असून ते पोलीस महानिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या वतीने त्यांना विविध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले असून सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत, हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे.
काय आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे?
धुळे लोकसभा मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मुस्लिम मतदार असून या मतदारांचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे सांगण्यात येत होते. महाविकास आघाडी कडून धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असता तर या मुस्लिम मतदारांचा फायदा काँग्रेसला होऊन त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तर दुसरीकडे एमआयएम कडून धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारामुळे ही राजकीय समीकरणे आता बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुती, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून या मतदारसंघातील मुस्लिम मतदार अब्दुल रेहमान यांच्या मागे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे आमदार फारुक शहा तर दुसरीकडे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुहम्मद खलीक हे दोन मुस्लिम उमेदवार असून त्यांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळेल का, हे देखील पुढील काळात पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या