धाराशिव : येथे लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजकीय नेते एकमेकावर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महाविकास आघाडीन (Maha Vikas Aghadi) येथून ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर आता महयुतीकडून (Mahayuti) कोणाला तिकीट दिले जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. महायुतीकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करणारे भाजपचे नेते राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे. निंबाळकर हे गुन्हेगार आहेत, असं त्या म्हणाल्यात. 


नराधम म्हणत टोकाची टीका 


भाजपचे नेते तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह निंबाळकर हे लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. भाजपकडून त्यांना तिकीट दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवासांपासून त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या सक्रिय झाल्या आहेत. त्या वेगवेगळे कार्यक्रम,बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडीचे धाराशीवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केलीय. ओमराजे हे नराधम आणि गुन्हेगार आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत.


निंबाळकर यांना डिवचलं


अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवलं आहे. यामध्ये त्यांनी निंबाळकर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत की गुन्हेगार. धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा नराधम असंही अर्चना पाटील यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलंय. तसंच ओमराजे निंबाळकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्याचा दाखल आहे, असे म्हणत ओमराजे हे नराधम असल्याचीही टीका त्यांनी केलीय. 


धाराशीवमध्ये राजकारण पेटणार 


दरम्यान, अर्चना पाटील यांच्या या टोकाच्या टीकेमुळे धाराशीवमधील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. या जागेसाठी अनेक नेते उत्सुक आहेत. यामध्ये माजी सनदी अधिकरी प्रविण परदेशी, राणाजगजितसिंह पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.


2019 सालच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं?


2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना एकूण 49.2 टक्के मते मिळाली होती. तेव्ह राणाजगजितसिंह यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत साधारण 38 टक्के मते मिळवली होती. ओमराजे निंबाळकर यांन राणाजगजितसिंह यांच्यावर विजय मिळवला होता. सध्या राणजगजितसिंह हे भाजपत आहेत. यावेळीदेखील मला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छ आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही चालू आहेत. त्यामुळे या जागेवर नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा >>


मोठी बातमी : इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM ची मोठी घोषणा