Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना तर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वाकचौरे विरुद्ध लोखंडे आमने सामने येणार आहेत. मात्र, काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या उत्कर्षा रूपवते या  बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. उत्कर्षा रूपवते यांनी बंडखोरी केल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


2014 लोखंडेंचा 2 लाख मतांनी विजय 


 2014 मध्ये देखील या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली होती. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये लोखंडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होऊनही खासदार होण्याचा मान मिळवत तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. आता भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. शिवाय गेल्या 10 वर्षात विद्यमान खासदार कोणतही काम करू शकले नसून जनता माझ्या पाठीशी असल्याचा दावाच त्यांनी केलाय. तर गद्दार कोण हे जनता ठरवेल असा इशारा लोखंडे यांना दिलाय.


 शिवसेना नंतर काँग्रेस त्यानंतर पुन्हा भाजप आणि अपक्ष असा प्रवास करत मशाल हाथी घेतलेल्या उमेदवाराने गद्दार कोण हे सांगू नये, असा टोला लोखंडे यांनी वाकचौरे यांना लगावलाय. तर मी 2014 पासून धनुष्यबाण चिन्ह घेऊन जनतेत गेलोय. आजही ते सोडलेलं नाही, असं वक्तव्य करत शिंदे सोबत जाण्याच्या निर्णयाचं लोखंडे यांनी समर्थन केलंय.


काँग्रेस नेत्या बंडखोरी करण्याच्या तयारीत 


यावेळी काँग्रेसने जागा सोडल्याने इच्छुक असणाऱ्या उत्कर्षा रूपवते मात्र नाराज असून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी व समाजाशी बोलून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य करताना महाविकास आघाडीला विजय मिळवायचा असेल तर निर्णयाचा फेरविचार करा, असा इशाराच रुपवते यांनी दिलाय.


4 टप्प्यात पार पडणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील या आजी माजी महसूलमंत्र्यांचे मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. 


भाऊसाहेब वाकचौरे बलस्थाने


पाच वर्ष खासदार असताना गावोगावी जोडलेले कार्यकर्ते आहेत. खासदारकीच्या काळात ग्रामीण भागात सभामंडप बांधले. शिवाय, आपला माणूस आपल्यासाठी हे ब्रीद वाक्य जनतेत पोहचविण्यात त्यांना यश आलंय. उध्दव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. 


भाऊसाहेब वाकचौरे कमकुवत बाजू


आजवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेकदा पदासाठी वारंवार पक्ष बदलले आहेत. शिवसेना, काँग्रेस, भाजप, अपक्ष व पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीमुळे मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


सदाशिव लोखंडे बलस्थाने


गेल्या 10 वर्षापासून खासदार आहेत. निळवंडे धरणाच्या कालवे  निर्मितीपासून पाणी येईपर्यंत केलेला संघर्ष जनतेपर्यंत मांडता येईल. प्रत्येक मतदार संघात केलेली विकास कामे आहेत. महायुतीचे सर्वांत जास्त आमदार असल्यामुळे त्याचा फायदा सदाशिव लोखंडे यांना होऊ शकतो. अजित पवारांच्या महायुतीमध्ये येण्याने ताकद वाढली आहे. 


सदाशिव लोखंडे कमकुवत बाजू


सदाशिव लोखंडे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. मात्र, जनतेत येत नसल्याच्या वाढलेल्या तक्रारी त्यांची डोकेदुखी ठरु शकतात. मतदारसंघात कमी व  मुंबईत जास्त वास्तव्य करत असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला आहे. 2 वेळा संधी देऊन खासदार करणाऱ्या उध्दव ठाकरे यांची सोडलेली साथ अंगलटही येऊ शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Madha : गिरीश महाजन दुसऱ्यांदा प्रयत्न करणार, माढ्यातील निंबाळकर-मोहिते पाटील वाद सोडवणार?