मुंबई: महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे जे काही खासदार हमखासपणे निवडून येतील, त्यामध्ये धाराशीवच्या ओमराजे निंबाळकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ठाकरे गटाकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावरच विश्वास दाखवला होता. त्यामुळे आता महायुती त्यांच्याविरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार, याची सर्वांना उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी धाराशीव लोकसभा मतदारसंघातील (Dharashiv Loksabha) उमेदवार जाहीर करण्यात आला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील (Archana Patil) यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. 


महायुतीच्या जागावाटपात धाराशीव लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला होता. त्यामुळे अर्चना पाटील यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी गुरुवारी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले. आतापर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा स्वतंत्र व्यासपीठांवर केली होती. परंतु, अर्चना पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा हे महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असताना होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. 


धाराशीवमध्ये उमेदवार आयात का करावा लागला, सुनील तटकरे म्हणाले...


धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी देताना काय निकष होता, असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर सुनील तटकरे यांनी म्हटले की, धाराशीवमध्ये सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांची नावं प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत होती. विक्रम काळे विधानपरिषदेत निर्वाचित होऊन एक वर्षच झालं आहे. सतीश चव्हाण यांचीही विधानपरिषेदतील तीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबात गांभीर्याने चर्चा नव्हती, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. 


यावेळी तटकरे यांना धाराशीवमध्ये भाजपमधून उमेदवार आयात का करावा लागला, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर तटकरे यांनी म्हटले की, आपण देशभरात आणि राज्यात पाहिलं तर उमेदवारांची निवडून येण्याची क्षमताच विचारात घेतली लागते. या गोष्टींचा सारासार विचार करत आम्हाला राज्यात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी अर्चना पाटील यांना धाराशीवमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.


आणखी वाचा


पवनराजेंच्या हत्येनंतर बाळासाहेबांनी मला पदरात घेतलं, उपकार कधीच विसरणार नाही, ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना शब्द