सांगली : कोरोनाचा बाऊ करून सरकार अधिवेशनातून पळ काढत असल्याच्या आरोपावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. देशात कोरोना वाढत असल्याचं त्यांना दिसत नसेल, तर काय म्हणावं? अशा शब्दात मुंडेंनी पाटील आणि खोत यांच्या त्या विधानाची खिल्ली उडवली आहे. तसेच 1 ते 19 मार्च दरम्यान अधिवेशन होणार असल्याचं निश्चित झाल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनी मधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंडे माध्यमाशी बोलत होते.


जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही सरकार आज तडजोड करण्याची भूमिका घेत नाही. राज्य सरकार विरोधी पक्षाच्या कोणत्याही विषयावर पळ काढण्याची भूमिका घेत नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे 1 ते 19 मार्चदरम्यान अधिवेशन होणार आहे. मात्र, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांकडे काय माहिती आहे, आपल्या लक्षात येत नाही, अशी खिल्लीही मंत्री मुंडे यांनी उडवली आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ : सदाभाऊ खोत


मुंडे यांच्या तोंडी पुन्हा तो 'शेर'
रेणू शर्माने केलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्या प्रकरणात त्यांच्या राजींनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून केली गेली. आता ते प्रकरण सध्या शांत आहे. मात्र, इस्लामपूर मधील कार्यक्रमाचा शेवट मुंडे यांनी "तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, बदनाम करने की मै जब जब बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू" या त्यांच्या आवडत्या शेरने केला. त्यामुळे मुंडे यांनी त्यांचा आवडता शेर पुन्हा एकदा म्हणून दाखवला खरा, मात्र हा शेर म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि मुंडे यांच्या या आवडत्या शेरला अधिक महत्व प्राप्त झाले.