सांगली : माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा आता बाऊ केला जातोय. कोरोनाचा बाऊ करूया आणि आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळुया असा सरकारचा विचार आहे, असे खोत म्हणालेत. कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, म्हणून महाविकास आघाडीचे सरकार हे दारुडं सरकार आहे, असे खोत म्हणाले.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शिवजयंतीवर घालण्यात आलेले निर्बंध, यावरुन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. हे सरकार चाललं आहे, ते सरकार आंधळे, मुके आणि बहिरे सरकार आहे. एका बाजूला हे सरकार यात्रा काढत आहे, दुसऱ्या बाजूला मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम होत आहेत. परंतु, जनतेचा आवाज गेल्या 2 वर्षांपासून सरकार दाबण्याचे काम करत आहे. जेणेकरून जनता रस्त्यावर येऊ नये, म्हणून काही वेळा हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपते, काही वेळा कोरोनाच्या आडाला दडून बसतं. आता तर अधिवेशन तोंडावर आले आहे. या सरकारला या अधिवेशनातून पळ काढायचा आहे. म्हणून आता सगळीकडे हे सरकार बोंब मारत आहे.
सहा महिने कोरोना कुठे झोपला होता का? : खोत
कोरोना वाढला आहे. सहा महिने कोरोना कुठे झोपला होता का? सहा महिने तुम्ही चाचण्याचं घेतल्या नाहीत, असा याचा अर्थ आहे. आता अधिवेशनात जनतेचे प्रश्न विरोधी आमदार मांडणार, आपल्याला तोंड द्यावे लागणार, म्हणून हे सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे, असा आरोप आमदार खोत यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या सरकारचे 'एकचं प्याला' या नाटकाचे वर्णन करावे लागले. हे सरकार दारुडे सरकार असल्याची टीका खोत यांनी केली आहे.