बीड: लोकसभा निवडणुकीत 6000 मतांनी आमची इज्जत गेली. ही खूप खोलवर झालेली जखम आहे. ही जखम अद्याप भरलेली नाही, असे वक्तव्य अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. ते सोमवारी बीड (Beed News) विधानसभा मतदारसंघात बाबा सिद्दिकी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांसह मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे हा मेळावा पार पडला.


यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना बीड लोकसभेत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अद्यापही मनात असल्याचे सांगितले. सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली. ही जखम खोलवर झालेली आहे. ती अद्याप भरुन निघालेली नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.  मविआ सरकारच्या काळात मौलाना महामंडळासाठी दीड हजार कोटी रुपये मागणी केली होती. मात्र, तत्कालीन सरकारने दमडीही दिली नाही. अजितदादा या सरकारमध्ये आले आणि निधी मंजूर करण्यात आला, असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला.


सामनाच्या अग्रलेखातील टीकेला धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर


भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी खतपाणी घातले, अशी टिप्पणी दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून करण्यात आली होती. यावरुन धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, मला बोलायला अतिशय दुर्दैव वाटत आहे. स्वर्गीय बाळासाहेब असले असते तर त्यांना वाईट वाटले असते. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना त्यांचं नाव घेऊन बदनाम केले जात आहे. गोपीनाथ मुंडे हे शिलेदार राहिले आहेत. मुंडे साहेब यांची बदनामी करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. संजय राऊत शिवसेना पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत. मुंडे साहेब असताना काहीही बोलले नाहीत. ते नसताना त्यांच्याबद्दल बोलताना संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे.


संभाजी राजे यांना उशिरा का होईना शेतकरी समजले आहेत. तुम्ही राजे आहात. संभाजी राजे हे आरोप करतात हे शोभानीय नाहीत. संभाजी राजे यांना सरसकट या शब्दाचा अर्थ कळलं तर बरे होईल. मी असा कृषी मंत्री आहे, जो दिवसरात्र शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.


आणखी वाचा


बीडमध्ये मोठा उलटफेर! कृषीमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे मनोज जरांगेंच्या भेटीला; मराठवाड्यात राजकीय भूकंप