मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणार आहे. महायुतीची थोड्याच वेळात बैठक मुंबई विमानतळावर होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असून यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बैठकीसाठी दाखल झाले असल्याची माहिती आहे.  अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते, त्यावेळी अजित पवार उपस्थित नसल्यानं चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र,अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे अमित शाह यांच्या भेटीसाठी विमानतळावर दाखल झाले असून तिथं महायुतीची बैठक होणार आहे. 


अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीसाठी भाजपकडून राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.  शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.  


भाजपच्या सुकाणू समिती सोबत अमित शाह यांची चर्चा झाल्यानंतर जागा वाटपाच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत देखील चर्चा होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  


अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. काल आणि आज अमित शाह मुंबईत होते. आता मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईचा दौरा संपण्यापूर्वी महायुतीची विमानतळावर बैठक पार पडणार आहे. 


भाजप नेत्यांना अमित शाह यांनी कोणत्या सूचना दिल्या?


केंद्रीय गृहमंत्री यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत काल झालेल्या बैठकीत महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून झालेल्या चुका यावेळी करुन नयेत अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्याची माहिती आहे.  महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी, असं देखील अमित शाह यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे. 
 
महायुतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्या आहेत. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या, असं देखील अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती आहे.


भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवर अमित शहा यांनी लक्ष वेधलं असल्याची माहिती आहे.  राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्याचे भाजप नेत्यांना आदेश शाह यांनी दिले आहेत. भाजपच्या काही आमदारांची कामगिरी  समाधानकारक नाही  जागा बाबत योग्य निर्णय घ्या, असं देखील अमित शाह यांनी सांगितलं आहे.  


इतर बातम्या :


Ajit Pawar: 'लालबागचा राजा'च्या दरबारी अमित शाहांसोबत सगळे नेते झाडून आले, अजितदादा मुंबईत असूनही गैरहजर, चर्चांना उधाण


मनोज जरांगे यांची बाजू घेतो का म्हणून बार्शीत एका तरुणाला मारहाण? राजेंद्र राऊतांनी आरोप फेटाळले