मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ख्याती असलेले अमित शाह यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक मुंबईतील लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. यावेळी अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे हे नेते लालबागमध्ये उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईत असूनही अमित शाह यांच्यासोबतच्या या दौऱ्यावेळी उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. 


अजित पवार हे रविवारी महायुतीच्या बैठकीसाठी तातडीने बारामतीहून मुंबईला आले होते. मात्र, ही बैठक होऊ शकली नव्हती. त्यानंतर अजित पवार हे त्यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावरच होते. मात्र, तरीही अजित पवार सकाळी अमित शाह यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला का आले नाहीत, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्याविरोधात टीका केली जात आहे. अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणे, हा शिंदे गटाचा उद्देश असल्याची चर्चा आहे. अशातच आज अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत लालबागमध्ये दिसून न आल्याने या सगळ्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे.  अजितदादा अमित शाह यांच्यासोबत दौऱ्यात का नव्हते, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.  


अजित पवारांची जीएसटी परिषदेच्या बैठकीला दांडी


राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे सोमवारी होणाऱ्या वस्तू व सेवा कर कायदा (GST) परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर केवळ एकदाच जीएसटी परिषदेच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिले होते. आजच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्या ऐवजी अदिती तटकरे बैठकीसाठी दिल्लीला गेल्याचे समजते.
 
अजित पवार मागील बैठकीला उपस्थित न राहिल्याने शरद पवार गटाने अजित पवारांवर निशाणा साधला होता.  आज पुन्हा अजित पावर बैठकीसाठी अनुपस्थित राहणार असल्याने राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आल्यामुळे अजित पवार बैठकीला गेले नसल्याची माहिती  अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. 


 अजित पवार मुंबई एअरपोर्टवर अमित शाहांना भेटणार


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. भाजपकडून राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित राहतील. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित असतील. 


भाजपच्या सुकाणू समिती सोबत अमित शाह यांची चर्चा झाल्यानंतर जागावाटपाच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.



आणखी वाचा


मोठी बातमी: जावई-नातीला सोबत घेऊन शरद पवार लालबाग राजाच्या दर्शनाला