सोलापूर : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत. रविवारी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेणार आहेत. उद्याच त्यांचा वाढदिवस असून यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांच्या अकलूजच्या निवास्थानी जाणार आहेत. 2004 नंतर पहिल्यांच शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येणार आहेत. सकाळी पवार मोहिते पाटलांच्या घरी भोजन करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील हाती तुतारी घेणार
वाढदिवस असल्याने माढा मतदारसंघातून सर्व मोहिते पाटील यांचेवर प्रेम करणारे कार्यकर्ते येत आहेत. आमच्या तीन पिढ्यांपासून आमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतली. भाजपने तिकीट नाकरल्यावर मी शांत बसलो होतो, मात्र कार्यकर्तेच बसू देत नव्हते. उद्या शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे घरी जेवायला येणार असून दुपारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे, अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे.
कोणी काही सांगितलं, तरी तुतारीचं काम करणार : रघुनाथ राजे निंबाळकर
रघुनाथ राजे निंबाळकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कोणी काही सांगितलं, तरी मी तुतारीचं काम करणार आहे. युती धर्म कळायला मी कोणत्या पक्षात नाही. आमचा विरोध भाजपला नाही तर उमेदवाराला आहे. आम्ही काय दोन नंबरवाले नाही त्यामुळे ईडीची भीती आम्हाला नाही. अखेर रामराजे निंबाळकर यांचे धाकटे बंधू रघुनाथ राजे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना तुतारीचं काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा
धैर्यशील मोहिते पाटील यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या माळशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन पाहणी केली . अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत. डाळिंब बागा आडव्या झाल्या असून विजेचे खांबही कोसळले आहेत. यामुळे बाधित लोकांना भेटून तहसीलदार यांना पंचनामे करायच्या सूचना त्यांनी दिल्या आहे. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना ही सूचना देण्यात आल्या आहेत.
वाढदिवसाच्या कार्यक्रम सोडून नुकसानग्रस्त भागात
माळशिरस तालुक्यात वादळी वारे आणि गारपिटीचा फटका बसला आहे. धैर्यशील मोहिते पाटील पहाटेपासून नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. शुक्रवारी माळशिरस तालुक्यातील नातेपुते, मांडवे, दहिगाव या परिसरात वादळी वारे आणि गारपिटीने दणका दिला होता. यात अनेक घरांचे पत्रे उडून गेले, झाडे, विजेचे खांब पडले, काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत.
या नुकसानीची माहिती समजताच आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रम सोडून धैर्यशील मोहिते पाटील पहाटे पासून या भागातील नुकसानीची पाहणी करीत आणि नागरिकांना दिलासा देत आहेत. उद्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अकलूज येथे प्रवेश होणार असून आज त्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम सोडून ते ग्रामीण भागात पोचले आहेत .
महत्त्वाच्या इतर बातम्या :